अक्कलकुवा तालुक्यातील निंबीपाडा मो. शाळेत आदिवासी दिन उत्साहात साजरा

अक्कलकुवा तालुक्यातील निंबीपाडा मो. शाळेत आदिवासी दिन उत्साहात साजरा
नंदुरबार: दि.९
राज्यात नंदुरबार जिल्हा हा आदिवासी जिल्हा म्हणून ओळखला जातो. आदिवासी समाजाची एक स्वंतत्र जीवनशैली आहे. रुढी, प्रथा, परंपरा आणि सामाजिक कायदे यांच्या आधारे स्वशासन अशी त्यांची वैशिष्ट्यपूर्ण समाजव्यवस्था अस्तित्वात आहे. अबोल आदिवासी समाजनेही आता मुख्य प्रवाहाची वाट धरली आहे. या समाजातून शिक्षित आणि स्पर्धा परीक्षांमध्ये नैपूण्य दाखविणाऱ्यांचा टक्कादेखील वाढला आहे. वर्तमानातून उज्ज्वल भविष्याकडे आणि समाजाच्या मुख्य प्रवाहात जाताना आपल्या गौरवशाली परंपरांचे जतन करणारा आदिवासी समाज अशी एक नवी ओळख निर्माण झालेली आपणास इथे दिसते. हि परंपरा सतत चालू रहावी,संस्कृतीचे जतन व्हावे करिता स्थानिक पातळीवर विविध कार्यक्रम आयोजित केले जात आहे. जागतिक स्तरावर ९ ऑगस्ट हा विश्व आदिवासी दिवस म्हणून साजरा केला जातो. या विश्व आदिवासी दिवसाचे औचित्य साधत जि.प.शाळा निंबीपाडा मो. शाळेत सालाबादप्रमाणे शाळेत विश्व आदिवासी दिवस साजरा करण्यात आला. या शुभ कार्यक्रम प्रसंगी शाळेचे व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष माकता वसावे, मुख्याध्यापक मगन पाडवी शाळेतील शिक्षक,विद्यार्थी,पालक व तरुण यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली. कार्यक्रमाची सुरुवात शाळा ते गावाच्या मुख्य परिसरात ढोल वाजवत, घोषणा देत रॅली काढून झाली. बिरसा मुंडा, तंट्या भील यांची ओळख व्हावी म्हणून विद्यार्थ्यांनी तिर कामठ्या घेत हुबेहूब रूप धारण केले होते. पावसाची तमा न बाळगता रॅलीत शाळेतील १ली ते ८ वी वर्गातील २२५ पेक्षा जास्त विद्यार्थ्यानी उपस्थिती दर्शविली. रॅलीत विद्यार्थ्यांनी परंपरागत आदिवासी पेहराव परिधान केल्याने रॅलीची शोभा निराळीच दिसत होती. रॅली नंतर शाळेत धरती आबा बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
विश्व आदिवासी दिवसाचे महत्त्व विद्यार्थीना लक्षात आणून देण्यासाठी मुख्याध्यापक मगन पाडवी, सरदार वळवी, गोविंद पाडवी, नितेश वळवी, संजय वसावे व आयमनसिंग नाईक यांनी माहिती दिली. आदिवासी दिना निमित्त शाळेतील विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. कार्यक्रमात आदिवासी गाण्यांवर नृत्य सादर करण्यात आले. कार्यक्रम अंती परंपरागत ढोल वाजवत सामुहिक आदिवासी नृत्य विद्यार्थी,शिक्षक, पालक आणि तरुणांनी सादर केले. विद्यार्थ्यांचा आनंद व उत्साह पाहून मध्यान्ह भोजनात मिष्ठान्न भोजन देण्यात आले. पालकांच्या मोठ्या उपस्थितीत आनंद साजरा करत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.


