निष्ठेची किंमत, भावनेचा मान आणि उमेदवारीचा खरा न्याय आपले गिरीश भाऊ देणारच : कार्यकर्त्यांना आशा , अपेक्षा

जामनेर – मच्छिंद्र सदाशिव इंगळे
स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक जवळ येत आहे. शहरापासून तालुक्यापर्यंत, चौकापासून चौपालपर्यंत, किराणा दुकानापासून चहाच्या टपऱ्यांपर्यंत—जिथे दोन माणसं भेटतात तिथे चर्चेचा एकच विषय सुरू आहे — “नगरसेवक पदासाठी उमेदवारी कोणाला मिळणार?”
आज परिस्थिती अशी आहे की उमेदवाही अनेक आहेत. सर्वांनी भाऊंना आपला विश्वास दिल्याचं चित्र रंगवलं आहे, भाऊंनीही कोणाला नकार देऊन नाराज न करण्यासाठी सर्वांना प्रोत्साहनाचे बोल दिले आहेत. त्यामुळे लोकांमध्ये चर्चा अशी की, “होकार तर सर्वांना आहे, पण नारळ कोणाच्या हातात ठेवला जाणार?”
पण या चर्चेपलीकडे एक महत्त्वाची, जिव्हारी लागणारी बाब आहे —
जुने निष्ठावंत कार्यकर्त्यांचे स्थान आणि त्यांचा सन्मान.
निष्ठा म्हणजे फक्त उपस्थिती नसते — ती वर्षानुवर्षे टिकवलेला विश्वास असतो
भाऊंच्या राजकीय प्रवासात काही कार्यकर्ते असे आहेत ज्यांनी फक्त प्रचारात भाग घेतला नाही, तर चांगल्या-वाईट काळात, विजय-पराजयात, कौतुक आणि टीकांच्या वादळात—अखंड सोबत केली आहे.
सरपंच निवड असो, पंचायत समितीची चढाओढ असो, जिल्हा परिषद निवडणूक असो किंवा विधानसभेचे रणांगण—हे कार्यकर्ते प्रत्येक वेळी पहिल्यांदा पोहोचले आणि शेवटपर्यंत खंबीर उभे राहिले.
हे कार्यकर्ते राजकारणात प्रसिद्धीसाठी किंवा पदासाठी आलेले नाहीत.
ते भाऊंच्या विश्वासातून, भाऊंच्या स्वभावातून, भाऊंच्या मोठ्या मनातून जोडले गेले आहेत.
भाऊंची हसरी मुद्रा, साधेपणा, लोकांशी मायेने बोलण्याची शैली, आणि संकटात हात पुढे करून आधार बनण्याची वृत्ती — यामुळे हे कार्यकर्ते भाऊंना फक्त नेता म्हणत नाहीत—ते त्यांना परिवार मानतात.
पण आज व्यथा अशीही आहे…
जुने कार्यकर्ते भाऊंना भेटायला गेले की मध्ये काही बडवे, आयाराम, आस्तीनातले साप प्रकारचे लोक अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न करतात अश्या संतप्त भावना काही सच्चे कार्यकर्ते त्यांच्या प्रतिक्रिया नोंदवू लागले आहेत .
कधी सांगतात, “भाऊ व्यस्त आहेत.”
कधी म्हणतात, “आज भेट शक्य नाही.”
कधी मुद्दाम वेळ पुढे ढकलतात.
जुने निष्ठावंत कार्यकर्ते यांना हे माहित आहे —
भाऊ कधीही त्यांच्या माणसांना दूर ठेवणार नाहीत.
परंतु भाऊंपर्यंत पोहोचायच्या मार्गात उभ्या असलेल्या या कृत्रिम भिंती त्रास देतात.
हे कार्यकर्ते भाऊंच्याविरोधात शब्द कधी काढत नाहीत.
कारण ते म्हणतात —
“भाऊ हसले म्हणजे आम्ही हसलो. भाऊ दुःखी झाले तर आम्ही तुटलो.”
“भाऊ खुश तर आम्ही खुश. आमच्या भावना आम्ही गिळून घेतो, पण भाऊंचा चेहरा कधी पडू देत नाही.”
ही भावना, ही निष्ठा, ही माणुसकी आजच्या राजकारणात दुर्मिळ आहे.
उमेदवारीचा खरा न्याय काय?
उमेदवारी ही गणिताने नाही दिली जात.
उमेदवारी ही मनाच्या निष्ठेने आणि जनतेच्या स्वीकृतीने दिली जाते.
कोण सोशल मीडियात जास्त फोटो टाकतो म्हणून उमेदवारी मिळत नाही.
कोण चपला उचलून फिरला, कोण रोज ऑफिसला बसला, कोण बडव्यांपुढे हात जोडला म्हणून ही जागा देण्याची वेळ नाही.
उमेदवारी त्या कार्यकर्त्याला हवी—
ज्याची जनता दखल घेते,
ज्याच्या शब्दाला वजन आहे,
जो लोकांच्या सुख-दुःखात खरोखर उपस्थित असतो,
जो भाऊंच्या प्रतिष्ठेला भार नाही, तर सामर्थ्य देतो.
भाऊंपर्यंत भावना पोहोचायलाच हव्यात
भाऊ नेहमीच हृदयाने विचार करणारे आहेत.
भाऊंच्या मनात कार्यकर्त्यांसाठी अपार प्रेम आहे.
म्हणूनच या वेळी एकच विनंती —
जुने निष्ठावंत कार्यकर्ते यांची भावना आणि त्यांची वर्षानुवर्षांची साथ भाऊंपर्यंत स्पष्ट शब्दात पोहोचवली पाहिजे.
कारण—
उमेदवार एक असेल.
परंतु पक्षाचा खरा पाया म्हणजे त्याचे कार्यकर्ते.
जर पाया मजबूत असेल तर इमारत उभी राहते.
जर पाया तडफडला तर लाखो रुपये खर्च करूनही ती इमारत टिकत नाही.
शेवटची ओळ —
या वेळेस नारळ फक्त हातात नाही ठेवला जाणार — तर निष्ठेच्या हृदयात ठेवला जाणार आहे.


