जिल्हा पोलीस दलातर्फे आयोजित “मिशन सक्षम 2.0” कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा संपन्न..!

जिल्हा पोलीस दलातर्फे आयोजित “मिशन सक्षम 2.0” कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा संपन्न..!
सोशल पोलिसिंगद्वारे तरुणांना रोजगाराची संधी मिळून सक्षम बनविण्यासाठीचा उपक्रम, कार्यक्रमास तरुणांचा उत्स्फुर्त प्रतिसाद..
नंदुरबार जिल्हयातील तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी, या उद्देशाने जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. श्रवण दत्त. एस यांचे संकल्पनेतून नंदुरबार ‘जिल्हा पोलीस दल’ व ‘प्रथम’ या संस्थेच्या संयुक्त विदयमाने “मिशन सक्षम” या उपक्रमाची जानेवारी 2025 मध्ये सुरूवात करण्यात आली. सुरुवातीला या उपक्रमात 200 तरुणांनी सहभाग घेऊन आपले प्रशिक्षण पूर्ण केले होते व त्यांना प्रमाणपत्र देऊन रोजगाराची संधी मिळाली होती.
त्याच धर्तीवर आज रोजी जिल्हा पोलीस मुख्यालय येथे “मिशन सक्षम 2.0” कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. श्रवण दत्त. एस यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी बोलतांना पोलीस अधीक्षकांनी उपस्थित तरुणांना “मिशन सक्षम” या उपक्रमाबाबत सविस्तर माहिती देऊन ‘प्रथम’ या संस्थेच्या मार्फतीने घेण्यात येणाऱ्या निशुल्क प्रशिक्षणाबाबत अवगत केले. तसेच जिल्हयाबाहेर मुंबई, पुणे येथे प्रशिक्षण घेतल्याने नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करता येईल व प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रशिक्षणार्थीच्या भविष्यात कसे अमुलाग्र बदल घडतात त्याबाबत त्यांना प्रेरित केले. तसेच जानेवारी 2025 मध्ये घेण्यात आलेल्या उपक्रमावेळी प्रशिक्षण पूर्ण करुन आपली रोजगाराची संधी मिळविणाऱ्या तरुणांचा यावेळी सत्कार व कौतूक देखील पोलीस अधीक्षकांनी केले. यावेळी उपस्थित तरुणांनी आपले मनोगत व्यक्त करीत जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. श्रवण दत्त. एस व ‘सक्षम’ या संस्थेचे संचालक श्री. शिवाजी कदम यांचे आभार मानले.
प्रथम या संस्थेचे संचालक श्री. शिवाजी कदम यांनी तरुणांना मार्गदर्शन करीत संस्थेमार्फत घेण्यात येणाऱ्या विविध प्रकारचे रोजगार संदर्भात 45 दिवसाचे प्रशिक्षण दिले जाणार असल्याचे सांगितले. तसेच सदर प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर उमेदवारांना NSDC आणि शासकिय (Third Party Assesment) असे प्रमाणपत्र प्रदान केले जाईल, व रोजगाराची संधी देखील उपलब्ध करुन दिली जाणार असलेबाबत यावेळी सांगितले. सदर कार्यक्रमावेळी मुसळधार पाऊस सुरु असतांना सुद्धा तब्बल 307 तरुणांनी उत्स्फुर्त सहभाग नोंदविला आहे.



