यशाची विजय गाथा – मा.विजय घोगरे साहेब



विजय घोगरे यांचा जन्म ५मार्च १९६७ ला झाला. इंदापूर तालुक्यातील बावडा (जिल्हा पुणे) हे त्यांचे मूळ गाव. तेथून तीन किलोमीटरवर शेतामध्ये त्यांचे घर आहे. त्यांचे आईवडील शेतकरी होते. वडील व आई चौथीपर्यंत शिकलेले होते. त्या काळामध्ये शेतकरी कुटुंबातील बालपण काबाडकष्टाचेच असे, त्याप्रमाणे त्यांचेही बालपण कष्टातच गेले. मुख्य रस्त्यापर्यंत जायला तीन किलोमीटरचा खडी रस्ता चालून जावे लागत आणि शाळेत जायचे तर घरापासून पाच किलोमीटर अंतर पायी जावे लागायचे. घरची परिस्थिती फार हलाखीची. ओढाताण ही होतीच! गावात पाणी आहे, पण अनियमित पावसामुळे दर दोन-तीन वर्षांनी दुष्काळ हा ठरलेलाच असे. त्यात त्यांचे एकत्र कुटुंब होते. वडिलांना तीन भाऊ आणि पाच बहिणी होत्या. या कुटुंबाकडे २५ एकर जमीन होती. पाऊसपाणी ठीक झाले तरच जमीन पिकायची! त्यातून या एकत्र कुटुंबाचा गाडा ओढला जायचा.

विजय घोगरे यांचे आईवडील फार शिकलेले नव्हते पण आपल्या मुलांना मात्र खूप शिकवायचे ही त्यांची जिद्द होती. शेताला पाणी द्यायला काही अडचण आली की,
त्यांचे वडील बावडा (वकील वस्ती) या शेजारच्या गावात जायचे. तिथे एक ब्रिटिशकालीन इरिगेशन खात्याचा बंगला होता. त्यामध्ये नीरा डावा कालव्याचे व्यवस्थापन बघणारे इंजिनियर राहायचे. त्यांच्याकडे बघून त्यांच्या वडिलांनी पक्के ठरवले की, आपल्या मुलाला इंजिनियरच करायचे. वास्तविक त्यांच्या वडिलांच्या काळात, त्यावेळच्या भाषेत सांगायचे तर ‘चार बुके’ शिकला हेच अभिमानाने मिरवण्यासारखे होते. मॅट्रिक झाला तर आभाळाला हात लागले असेच वाटायचे. हे लक्षात घेता त्यांच्या वडिलांना आपल्या मुलाला इंजिनियर करावे असे वाटणे ही त्यांच्या प्रगल्भ बुद्धीची व दूरदर्शीपणाची साक्ष आहे.
विजय घोगरे यांचे पहिली ते चौथीचे शिक्षण जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत झाले. ती एक शिक्षकी शाळा होती. एक शिक्षक आणि चार वर्ग! पण त्या शिक्षकांनी त्यांच्या मनावर चांगला प्रभाव टाकलेला दिसतोय कारण आजही त्यांना गायकवाड गुरुजी हे त्यांचे नाव आठवतंय. त्यानंतर पाचवी ते सातवीचे शिक्षण श्री शिवाजी हायस्कूल, बावडा या शाळेत गावी झाले. तीही शाळा शिक्षणाच्या बाबतीत चांगली नावाजलेली होती, पण त्यांच्या वडिलांनी मुलांना इंजिनियर करण्याच्या दृष्टीने टेक्निकल शाळेत प्रवेश घ्यावा असा रास्त विचार करत सर्व भावंडांना यशवंतनगर (अकलूज) येथील टेक्निकल शाळेत घातले.

आठवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण येथे झाले. या शाळेतील त्यांची शैक्षणिक कामगिरी उत्तम होती. दरवर्षी ते वर्गात पहिला किंवा दुसरा नंबर मिळवायचे. दहावीलासुद्धा त्यांना ८३ % असे चांगले मार्क्स मिळाले. वडिलांनी त्यांना डिप्लोमाला टाकायचे ठरवले. चांगले मार्क असल्यामुळे त्यांना महाराष्ट्रात कुठेही प्रवेश मिळत होता. त्यांनी पुण्यातील प्रतिष्ठित गव्हन्मेंट पॉलिटेक्निक कॉलेजला प्रवेश घेतला. त्यांचे मोठे बंधू धनंजय हे पण तिथेच शिकत होते.
इ.स.१९८२ ते ८५ या कालावधीत त्यांनी डिप्लोमा कोर्स पूर्ण केला. डिप्लोमालाही त्यांना ८५% मार्क मिळाले. डिप्लोमा झाल्यावर लगेच त्या काळात सरकारी नोकरी मिळत असे. दुष्काळी भागातील शेतकऱ्यांची परिस्थिती हलाखीची म्हणावी अशीच असते. त्यामुळे मिळेल ती नोकरी स्वीकारून लगेच अर्थार्जन करण्याची गरज असते. त्यांच्या मोठ्या बंधूंनी डिप्लोमानंतर नोकरी करण्याचा पर्याय निवडला, पण विजयराव मात्र बी.ई. करायचे या निर्णयावर ठाम राहिले. बी.ई. साठी त्यांनी सांगलीचे वालचंद कॉलेज निवडले, कारण या कॉलेजचे शैक्षणिक वातावरण उत्तम आहे, अशी माहिती त्यांना मिळाली होती. इथेही त्यांनी देदीप्यमान यश मिळवले. बी.ई. ला ते वालचंद कॉलेजला दुसरे तर शिवाजी विद्यापीठात चौथे आले.
त्यानंतर त्यांनी एम.टेक. साठी GATE ही प्रवेश परीक्षा दिली. त्यामध्ये त्यांना ९३ टक्के स्कोअर आला. आय.आय.टी. दिल्ली व बनारस हिंदू युनिव्हर्सिटी, वाराणसी येथे त्यांना प्रवेश मिळत होता, पण त्यांनी पुण्याच्या शासकीय इंजिनियरिंग कॉलेजमध्ये (सी.ओ.ई.पी.) प्रवेश घेतला. कन्स्ट्रक्शन अॅन्ड मॅनेजमेंट हा अभ्यासक्रम त्यांनी तिथे यशस्वीरित्या पूर्ण केला. काही दिवस प्राध्यापक पदावर इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये नोकरी केली. नंतर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत कनिष्ठ अभियंता (ज्युनिअर इंजिनियर) या पदावर रुजू झाले; परंतु त्यांचे खरे ध्येय महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची ( एम.पी.एस.सी.) परीक्षा देणे हेच होते.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा जाहीर होताच, घोगरे हे कंबर कसून अभ्यासाला लागले. त्यांनी नोकरीतून रजा घेतली आणि पुणे विद्यापीठाच्या जयकर लायब्ररीची वाट धरली ! तिथे सकाळी ७ ते रात्री ११ पर्यंत म्हणजे दिवसाकाठी १५ ते १६ तास अभ्यास करायचे. तिथे एक चांगला ग्रुपच तयार झाला होता. संध्याकाळी फिरायला जाताना हे परीक्षार्थी एखाद्या विषयावर ग्रुप चर्चा करायचे. कच्च्या विषयांची पुन्हा पुन्हा उजळणी करायचे. इतक्या खडतर परिश्रमानंतर यश न मिळेल तरच नवल! त्या ग्रुपमधील एखाद / दुसरा अपवाद वगळता, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तम श्रेणी पास झाले.
आज अनेक तरुण एम.पी.एस.सी., यू.पी. एस.सी.च्या परीक्षेला बसतात. दुर्दैवाने त्यांमध्ये यश प्राप्त झाले नाही तर नैराश्याच्या गर्तेत सापडतात; पण लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी किती खडतर प्रयत्न करावे लागतात, हे विजय घोगरे यांच्या उदाहरणावरून लक्षात येते.
विजय घोगरे यांनी अगदी पहिल्या इयत्तेपासून एम. टेक. होईपर्यंत जिद्दीने अभ्यास करून चांगले शैक्षणिक यश मिळवले, त्यामुळे महाविद्यालयीन प्रवेशासाठी
त्यांना तडजोड करावी लागली नाही. त्यांच्या पसंतीची महाविद्यालये मिळत गेली. यावरून लक्षात येते की, गुणवत्ता असेल तर यशाची दारे आपोआप उघडली जातात.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतील उज्वल यशानंतर त्यांची पहिली नेमणूक जळगाव येथे झाली. सन १९९५ ला त्यांनी शासकीय सेवेमध्ये प्रवेश केला. तिथून पुढे त्यांनी आपल्या यशाचा आलेख उंचावत नेला. पहिल्या वर्षात कामाची ओळख व्हावी या दृष्टीने सर्वेक्षण करणे, नियोजन करणे अशा पद्धतीची प्राथमिक पण मूलभूत कामं दिली जातात. त्यावर्षी त्यांनी संपूर्ण जळगाव जिल्ह्याचा आराखडा तयार केला. ४० पेक्षा जास्त घरणांचे व लहान बंधाऱ्यांचे सर्वेक्षण करून प्रकल्प अहवाल तयार केले. सुदैवाने त्यांना सलग चार वर्षे जळगावमध्ये काम करण्याची संधी मिळाली, त्यामुळे ज्या कामाचा प्रकल्प (DPR) अहवाल केला होता, त्या प्रोजेक्टवर प्रत्यक्ष काम करण्याचे भाग्य त्यांना लाभले. जळगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वाघूर डॅम प्रोजेक्टवरही त्यांना काम करता आले. नोकरीच्या सुरुवातीच्याच या काळामध्ये त्यांना बरेच काही शिकायला मिळाले. जळगावला असताना वेगवेगळ्या मंत्र्यांबरोबर काम करायला मिळाले. एकनाथ खडसे, गिरीश महाजन यांच्यासारख्या मंत्रिमहोदयांबरोबर वैयक्तिक संपर्क झाला. सन १९९९ ला कार्यकारी अभियंता (एक्झिक्युटिव्ह इंजिनियर) या पदावर बढती मिळून वाघूर धरण विभाग जळगांव येथे नेमणूक मिळाली. जळगावला मिळालेली ज्ञानाची आणि अनुभवाची शिदोरी घेऊन त्यांनी पुण्याकडे कूच केली.
पुण्यात त्यांच्यासाठी एक मोठी संधी वाट पाहत होती. ती म्हणजे नीरा देवघर धरण प्रकल्प ! भोर तालुक्यांत असलेले २०० फूट उंचीचे व १२ टीएमसी क्षमतेचे हे धरण मुचनासाठी वापरले जाते. यामध्ये १७गावे पानी गेली, त्यामुळे ग्रामस्थांचे पुनर्वसन करणे, नाराजीला तोंड देणे, त्यांची आंदोलने, मोर्चे कुश हाताळणे अशी अनेक आव्हानात्मक कामे करावी लागतो. त्या प्रकल्पासाठी प्रथम ४० कि.मी.चा रस्ता नवीन करावा लागला. अजितदादा पवारसाहेब तेव्हा जलसंपदा राज्यमंत्री होते. त्यांचे या कामी चांगले सहकार्य लाभल्याचा उल्लेख विजय घोगरे आवर्जून करतात. तसेच या सहा वर्षांत विजयसिंह मोहिते पाटील, माजी मुख्यमंत्री व रामराजे नाईक निंबाळकर उपसभापती/मंत्री, अनंतराव थोपटे व इतर आमदारांनीदेखील त्यांना चांगली साथ दिली.
एवढ्या मोठ्या प्रकल्पावर काम करण्याची घोगरे यांची ही पहिलीच वेळ होती पण मिळालेल्या संधीचे त्यांनी सोने केले. आशिया खंडात सगळ्यात जलद गतीने पूर्ण केलेला प्रकल्प अशी या प्रकल्पाची ख्याती आहे. घोगरे साहेबांच्या दृष्टीने विशेष आनंदाची गोष्ट म्हणजे, ज्या नीरा देवघर प्रकल्पावर त्यांनी ५ काम केले, तेथील पाणी आज त्यांच्या शेतापर्यंत जाते. याहून आनंदाची गोष्ट आणखीन काय असणार?
त्यानंतर सातारा जिल्ह्यात बदली झाली. तिथे उरमोडी प्रकल्पावर काम करायला मिळाले. तिथे दोन मोठ्या पंप हाऊससाठी काम केले. महाराष्ट्रातील एकाच टप्प्यात पाणी उचलणारी ३०० फूट हो उपसा सिंचन योजना आहे. १६८० अश्वशक्तीचे (एच.पी.) ९ पंप एकाच ठिकाणी बसवण्यात आले. कृष्णेचे पाणी खटाव, माण यांसारख्या दुष्काळी भागात नेण्यात आले, त्यामुळे फार मोठा भूभाग सिंचनाखाली आला. हे काम फारच आव्हानात्मक होते. प्रकल्प कार्यान्वित होऊन प्रत्यक्ष पाणी तिथून बाहेर पडले
त्यावेळेला मोठा समारंभही झाला. माठ-सत्तर हजार लोक उपस्थित होते. त्यांच्या रूपाने जणू काही दुष्काळी भागातील तहानलेली भूमाताच कौतुक करण्यासाठी उपस्थित होती. या कार्यक्रमाला मा. शरद पवार व अन्य १०-१२ मंत्री व कित्येक आमदार आले होते.
त्यानंतर पुण्याला खडकवासला पाटबंधारे विभागांत बदली झाली. या विभागात खडकवासला, पानशेत, वरसगांव, टेमघर, पवना व चासकमान एवढ्या सर्व धरणांचे नियंत्रण होते. या काळामध्ये पुणे व पिंपरी चिंचवड पाणीपुरवठा, खेडच्या चासकमान धरणाचा कालवा हे सगळी कामं करायला मिळाली. पाणीपट्टी गोळा करणे, थकीत पाणीपट्टी वसूल करणे, योग्य ठिकाणी दंड आकारणे ही महत्त्वाची प्रशासकीय कामेही त्यांनी केली. त्या काळांत वार्षिक १०० कोटी पाणीपट्टी त्यांनी वसूल केली. पुण्याला पुरापासून होणाऱ्या घोव्याची कल्पना देणारी पूररेषा तयार करण्याचे काम या काळात (२००५ मध्ये) झाले. जास्त पाणी दिल्यामुळे जमिनी पाणथळ बनून दलदलयुक्त होतात. त्यासाठी भूमिगत ड्रेनेज व्यवस्था करण्याचे महत्त्वाचे काम सातारा, सोलापूर, सांगली, पुणे या जिल्ह्यांमध्ये केले. त्यानंतर त्यांच अधीक्षक अभियंता पदावर कोल्हापूर येथे प्रमोशन झाले. अधीक्षक अभियंता पदावर त्यांनी कोल्हापूर, सांगली, सातारा व पुणे जिल्ह्यांत काम केले. सातारा येथे त्यांना सलग सहा वर्षे अधीक्षक अभियंता पदावर काम करण्याची संधी मिळाली, त्यामुळे तेथे त्यांना जिहे-काठापूर योजना, तारेधरण, वांगमोरणा व इतर उपसा सिंचन योजनांची कामे पूर्णत्वास नेता आली. याकामी त्यांना छत्रपती उदयनराजे भोसले यांचे विशेष प्रेम लाभले. या कामात त्यांना मंत्री गिरीश महाजन, राज्यमंत्री विजय शिवतारे, शंभूराजे देसाई व शिंवेद्रराजे भोसले यांचे
विशेष सहकार्य मिळाले.
त्यानंतरची महत्त्वपूर्ण नेमणूक म्हणजे ठाण्याचे पोस्टिंग! यावेळी त्यांना मंत्रालयाचा प्रोटोकॉल सांभाळावा लागत होता. येथे कार्यभार सांभाळताना मुंबई व आजूबाजूच्या बारा महानगरपालिकांचे काम पाहिले. मुंबईला भातसा, वैतरणा तलावांतून पाणीपुरवठा करणे, रायगड, पालघर इत्यादी ठिकाणचा पाणीपुरवठा, पाणीपट्टी वसूल करणे यांसारखी महत्त्वपूर्ण कामं केली. नंतर मुख्य अभियंता या पदावर बढती मिळून छत्रपती संभाजीनगरला नेमणूक झाली. त्यावेळी कोकण विभागातील पाच जिल्ह्यांचा अतिरिक्त कार्यभार त्यांच्याकडे होता. सध्या तिथे अत्यंत कार्यक्षमतेने कार्यरत आहेत.
महाराष्ट्र शासनाचा कर्तव्यनिष्ठ अधिकारी म्हणून काम करत असतानाच त्यांनी इ.स. २००५ पासून सामाजिक काम करायलाही सुरुवात केली. इंजिनियरिंग क्षेत्रात महत्त्वपूर्ण असणाऱ्या इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअर्स या संस्थेमध्ये त्यांनी पुढे सेक्रेटरी, चेअरमन, भारताचे व्हॉइस प्रेसिडेंट ही महत्वपूर्ण जबाबदारी सांभाळली. दहावी बारावीमध्ये ज्यांना इंजिनियरिंगला प्रवेश मिळत नाहीं अशा विद्यार्थ्यांना ही संस्था इंजिनियरची समांतर पदवी (AMIE) देते. ही पदवी अधिकृत असून त्यानंतर केंद्र लोकसेवा आयोग व राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा देता येते. या संस्थेसाठी ते अभ्यासक्रम तयार करण्याचे कामही करतात; तसेच हैदराबादला इंजिनियरिंग स्टाफ कॉलेज आहे, शासकीय खात्यातील लोकांना तिथे ट्रेनिंग देण्यात येते, या संस्थेमध्ये व्याख्यान देण्याचे काम विजय घोगरे करतात. या संस्थेमध्ये अनेक मान्यवर लोक काम करतात. इंडियन स्टैंडर्ड ठरवणारी कमिटी, कोकण रेल्वे, दिल्ली मेट्रो इत्यादी संस्थांवर काम करणारे मान्यवर सरदार सरोवर प्रकल्प यामध्ये पदाधिकारी आहेत. मरीन इंजिनियरिंग व इतर १५ इंजिनियरिंग विभागातील तज्ज्ञ या संस्थेमध्ये आहेत.
मराठा सेवा संघाच्या माध्यमातून ते लोकांचे प्रबोधन करतात. अंधश्रद्धा निर्मूलन, जातीय तेढ कमी करणे, गोरगरिबांना मदत करणे असे या कामाचे स्वरूप असते. या संस्थेमार्फत सर्व जातीच्या गरजू मुलांसाठी होस्टेलची सोय केली जाते. सध्या त्यांचे संभाजीनगर, जालना, नांदेड, चंद्रपूर, हिगोली आणि नागपूर येथे हॉस्टेल्स् आहेत.
याखेरीज बीड व लातूर येथे काम चालू आहे. मुलांना करिअर मार्गदर्शन करताना मराठा सेवा संघातर्फे शिवनेरी किल्ल्यावर शिवजयंती साजरी केली जाते. चुकीचा इतिहास दुरुस्त करून त्याबाबतची एक लाख पुस्तके प्रसिद्ध केली आहेत. जिजाऊ प्रकाशन हे पुस्तकांची छपाई व विक्री करतात. अनेक कार्यक्रम सतत चालू असतात. अशा कार्यक्रमाच्या वेळी उद्योजक कक्षामार्फत मुलं नोकरीसाठी इतर समाजातील होतकरू मुलांना मदत करण्यात घोगरे नेहमी अग्रेसर असतात. नवउद्योजकांना कर्जही मिळवून देतात.
. नीरा देवघर धरणाचे आव्हानात्मक काम पूर्ण केले. २०० मीटर उंचीचे १२ टीएमसी पाणी साठवण्याची क्षमता असलेले धरण.
. उरमोडी प्रकल्पावर दोन मोठ्या पंप हाऊसचे काम करून खटाव, माण या दुष्काळ भागातील जमीन सिंचनाखाली आणली. जिहे-काठापूर योजना, तारेधरण, वांगमोरणा व इतर उपसा सिंचन योजनांची कामे पूर्णत्वास नेली.
पाणथळ जमिनीतून पाण्याचा निचरा करण्यासाठी भूमिगत ड्रेनेज सिस्टीम घातली.
• इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियर्स या संस्थेच्या माध्यमातून इंजिनियर होण्याची संधी हुकलेल्या युवकांना करिअरची संधी देतात.
. मराठा सेवा संघाचे विद्यमान अध्यक्ष आहेत. या संस्थेमार्फत गरजू मुलांना नोकरी, व्यवसायासाठी कर्ज, करिअर मार्गदर्शन, अशा उपक्रमात योगदान देतात.
विजय घोगरे यांना बॅडमिंटन खेळण्याचा व गिर्यारोहण करण्याचा छंद आहे. त्यांचे कौटुंबिक जीवनही सुखी समाधानी आहे. पत्नी वंदना या केमिस्ट्री घेऊन बी.एससी. झालेल्या आहेत. वंदना यांनी संपूर्ण कुटुंब,
तसेच नातेवाईक यांच्याशी अतिशय जिव्हाळ्याचे सबंध जपले आहेत. विजय यांना कामाच्या व्यस्ततेमुळे शक्य होत नसले तरी वंदना नातेवाईकांच्या सर्व कार्यक्रमांना जातीने हजर असतात. तसेच गावाकडील शेतीसबंधित सर्व कामे त्या अतिशय उत्तमरीत्या हाताळतात. त्यांची मुलगी सुप्रिया एम.एस. स्त्री रोगतज्ज्ञ असून, सध्या अटलबिहारी मेडिकल कॉलेजला प्राध्यापक आहेत. दुसरी कन्या क्षितिजा हिने एम. टेक. सिव्हिल, BITS Palani मधून पूर्ण केलेलं असून ती सध्या खासगी प्रक्टिस करत आहे. चिरंजीव चैतन्य यांची नुकतीच बारावी झाली असून ते व्हीआयटी वेल्लोर (तामिळनाडू) कॉलेज, येथे पदवीचं शिक्षण घेत आहेत. तेही निश्चितच उंच भरारी मारतील यात शंका नाही.
विजय घोगरे यांनी गुणवत्ता व प्रयत्न यांच्या आधारे स्वतःचे आयुष्य उत्तम पद्धतीने घडवले. प्राथमिक शिक्षणापासून इंजिनियरिंगमध्ये पदव्युत्तर शिक्षणापर्यंत त्यांची शैक्षणिक कारकीर्द अव्वल दर्जाची राहिली; इतकेच नव्हे तर त्यांनी इंजिनियरिंग आणि तत्त्वज्ञानामध्ये पी. एचडीसुद्धा मिळवली. स्वतःचे आयुष्य घडवत असताना, त्यांनी व्यसनांना कायमच दूर ठेवले. वाट्याला आलेले काम निष्ठेने करत राहिले, त्यामुळेच युवकांना ते अधिकारवाणीने सांगतात की, खूप मेहनत करायला हवी. सध्याचे युग हे स्पर्धेचे आहे. युवकांनी लोकसेवा आयोगाच्या परीक्षेकडे वळायला हवे. कोणतेही चांगले काम करायचे असेल तर शासकीय नोकरीच्या आधाराबरोबर राजकीय पाठबळ लागते. आपल्या मर्यादा व शक्ती स्थळे दोन्ही ओळखा आणि त्यानुसार वाटचाल करत राहा.
उजाड माळरानाची तहान भागवणारे, शेतकऱ्यांच्या डोळ्यांतोल अश्रूचे, आनंदाश्रूत रूपांतर करणारे विजय घोगरे यांच्यासारखे कर्तव्यनिष्ठ शासकीय अधिकारी हे लोकशाहीचे खरे आधारस्तंभ आहेत. त्यांच्या प्रयत्नांतून भारतभूमी नक्कीच सुजलाम् सुफलाम् होईल. त्यांच्या कर्तृत्वाला मानाचा त्रिवार मुजरा!



