राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी मा. श्री. एस. चोकलिंगम हे आज जळगाव जिल्हा दौऱ्यावर

जळगाव प्रहार
जळगाव –राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी मा. श्री. एस. चोकलिंगम हे आज जळगाव जिल्हा दौऱ्यावर आले होते. याप्रसंगी त्यांनी लोकसभा व विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीदरम्यान जळगाव जिल्ह्यातील अनुक्रमे 02 लोकसभा मतदारसंघ व 11 विधानसभा मतदारसंघात झालेल्या निवडणूक विषयक कामकाजाचा आढावा घेतला.
निवडणुकीदरम्यान जळगाव जिल्ह्यात राबविलेल्या विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती जाणून घेतली. निवडणूक प्रक्रियेत आलेल्या अडचणींबाबत अधिकारी यांचेकडून माहिती जाणून घेतली. निधीचा आढावा घेतला.
निवडणूक प्रक्रियेविषयक सविस्तर माहितीचे सादरीकरण जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी श्री आयुष प्रसाद यांनी केले. निवडणूक काळातील कायदा व सुव्यवस्था विषयक माहिती पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दिली.
बहुतांश नागरीक्षेत्र असलेल्या जळगाव शहर व भुसावळ या मतदारसंघात मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी केलेल्या मतदान जनजागृती मोहीमेचे याप्रसंगी त्यांनी कौतुक केले.
निवडणूक प्रक्रियेदरम्यान नियंत्रण कक्षाद्वारे करण्यात आलेल्या समन्वयविषयक कामकाजाची माहिती अपर जिल्हाधिकारी श्री. अंकुश पिनाटे यांनी दिली. निवडणूक प्रक्रियेदरम्यान नियुक्त मतदान अधिकारी व कर्मचारी यांचे प्रशिक्षण व त्यांचे परीक्षाविषयक राबविलेल्या उपक्रमाची माहितीचे सादरीकरण उप जिल्हा निवडणूक अधिकारी श्री. अरविंद अंतुर्लीकर यांनी केले. निवडणूक प्रक्रियेत उमेदवारांच्या सहाय्यतेसाठी तयार करणेत आलेल्या सहाय्यता कक्षाच्या 07 टप्प्यांतील कामकाजाविषयक माहितीचे सादरीकरण जळगाव तहसीलदार श्रीमती शीतल राजपूत यांनी केले.
बैठकीला अपर जिल्हाधिकारी श्री. अंकुश पिनाटे, उप जिल्हा निवडणूक अधिकारी श्री. अरविंद अंतुर्लीकर, निवासी उपजिल्हाधिकारी श्री. भिमराज दराडे, उपजिल्हाधिकारी रोहयो श्रीमती अर्चना मोरे, विशेष भूसंपादन अधिकारी श्रीमती जयश्री माळी, तहसीलदार जळगाव श्रीमती शितल राजपूत, तहसीलदार निवडणूक श्री. किशोर कदम व विविध विभागांचे विभागप्रमुख यांची उपस्थिती होती.

