आर्थिक

वैद्यकीय क्षेत्रात काम करताना रुग्णाच्या चिंता समजून घेऊन दयाळूपणाने वागा महामहीम राज्यपाल रमेश बैस यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

वैद्यकीय क्षेत्रात काम करताना रुग्णाच्या चिंता समजून घेऊन दयाळूपणाने वागा

महामहीम राज्यपाल रमेश बैस यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

 

जळगाव—-: जळगावाच्या शासकीय वैद्यकीय माहाविद्यालयातून उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन कार्यक्रमाच्या माध्यमातून उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी वैद्यकीय सेवा देताना रुग्णाना पहिले औषध हे दयाळूपणाचे द्या. प्रत्येक रुग्णाप्रती दयाळू रहा. त्यांच्या चिंता समजून घ्या आणि प्रत्येक रुग्णाशी भावनिक नाते निर्माण करा. हेच सूत्र आपल्याला उत्कृष्ट डॉक्टर बनवणार असल्याने महाविद्यलयातून बाहेर पडताना हा विचार नेहमीच डोक्यात असू द्या असे आवाहन महाराष्ट्र राज्याचे महामहीम राज्यपाल रमेश बैस यांनी केले.

 

जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातर्फे पहिल्या बॅचचा आंतरवासिता कालावधी यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा मंगळवार दि. १६ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजता छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात पार पडला. यावेळी आपल्या व्हिडीओ संदेशात महामहीम राज्यपाल रमेश बैस बोलत होते.

 

यावेळी दृश्य प्रणालीद्वारे महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. माधुरी कानिटकर, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर, डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रशांत सोळंके, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे उप अधिष्ठाता डॉ. मारोती पोटे (पदव्युत्तर), उप अधिष्ठाता डॉ. किशोर इंगोले (पदवीपूर्व), वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय गायकवाड, प्रशासकीय अधिकारी डॉ. जितेंद्र सुरवाडे व संजय चौधरी, मुख्य अधिसेविका प्रणिता गायकवाड मंचावर उपस्थित होते.

 

विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. माधुरी कानिटकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, आयुष्यात नक्कीच आपल्याला आपली ध्येय गाठायची आहेत. मात्र ही ध्येय गाठताना आपला विवेक शाबूत ठेवून व उत्कृष्ट माणूस म्हणून आपली समाजात प्रतिमा टिकून राहिली पाहिजे. वैद्यकीय क्षेत्र हे आव्हानात्मक आहे. पण आपल्यामुळेच अनेक रुग्णांना दिलासा मिळण्याचे काम होते. खरे तर ही देशसेवा आहे आणि या देशसेवेला आपण समर्पित झालो पाहिजे असे मत डॉ. कानिटकर यांनी व्यक्त केले.

 

यानंतर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी त्यांच्या महाविद्यालयीन आठवणींचा प्रसंग सांगून विद्यार्थ्यांना भावी आयुष्यासाठी व रोजगाराकरिता सदिच्छा दिल्या. रुग्ण सेवा करताना डॉक्टरांना दडपण असते. मात्र समर्पित भावनेने काम करताना डॉक्टर हे रुग्णाला पूर्णपणे बरे करण्यात यशस्वी असतात असेही आयुष प्रसाद म्हणाले.

 

कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यानंतर प्रास्ताविकामध्ये अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांनी प्रथम बॅचचा आढावा घेऊन, ही बॅच यशस्वीरित्या निपुण वैद्यकीय कौशल्य घेऊन आता सामाजिक क्षेत्रात जाणार असल्याबाबत अभिमान व्यक्त केला. रुग्णसेवा करताना सामाजिक बांधिलकी विद्यार्थ्यांनी जपावी असेही त्यांनी आवाहन केले.

 

यानंतर यशस्वी सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्राचे वाटप करून त्यांना निस्वार्थी वैद्यकीय सेवेची शपथ देण्यात आली. तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जळगावचा लोगो असलेले टपाल तिकिटाचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

 

सूत्रसंचालन डॉ. अब्दुल राफे आणि डॉ. आस्था गणेरीवाल यांनी केले. तर आभार डॉ. विजय गायकवाड यांनी मानले. प्रसंगी विद्यार्थ्यांचे पालक या हृद्य सोहळ्याला पाहण्यासाठी देशभरातून आलेले होते. यावेळी महाविद्यालय व रुग्णालयातील विविध विभागांचे विभाग प्रमुख, प्राध्यापक वर्ग, डॉक्टर्स, अधिकारी, कर्मचारी, परिचारिका आदी उपस्थित होते. सन्मान सोहळा यशस्वी करण्यासाठी विविध समित्यांनी परिश्रम घेतले.

0 0 0 0 0 0 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}