जामनेरात फक्त आमचे भाऊच !
जामनेर – वृषभ इंगळे
निवडणुका आल्याने गिरीषभाऊंविरुद्ध विरोधकांकडून प्रत्येक निवडणुकीप्रमाणे जातीय ज्वर चढविला जाणे साहजिकच आहे. परंतु मला असे वाटते की आता भाजपातील फक्त लालसेने थांबलेली काही माणसे भाजप सोडून गेली तरी, आगामी काळात जामनेर विधानसभा मतदारसंघातील लढत गिरीषभाऊंसाठी अगदी एकतर्फी होत जाणार हे नक्की.. खोटा नॅरेटीव पसरवून गिरीषभाऊंची मतदारसंघातील पकड ढिली नाही होणार..
*गेल्या काही वर्षांपासून “विरोधकांच्या संपर्कात असलेल्या”, “एकनिष्ठ” सरांना आता विरोधकांचा “पोस्टरबॉय” बनविण्यात येत आहे..*
२०१९च्या निवडणुकीत आमदारकीचा फॉर्म घेतल्यापासून राष्ट्रवादीच्या संपर्कात आहे, तरी भाजपाशी एकनिष्ठ असल्याचे सर स्वतः सांगतात… *सर्वप्रथम अश्या एकनिष्ठेला सलाम !*
सर, तुम्ही २०१९ पासून राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याचे सांगतात, मग भाजपाने तुमच्यावर का विश्वास ठेवावा ? तरी तो ठेवला…
पक्षाने गिरीषभाऊंची उमेदवारी जाहीर केल्यानंतरसुद्धा तुमच्या मनाला “राष्ट्रवादीचा” उमेदवारी अर्ज घेण्याचा ‘गद्दारी’ विचार शिवलाच कसा ?
आपल्या पक्षाच्या हिंदुत्ववादी विचारांशी तडजोड करणारा, विरोधी पक्षाच्या संपर्कात असणारा पक्षाचा कार्यकर्ता ‘एकनिष्ठ’ कसा असू शकतो ?
अनेक कार्यकर्त्यांचा विरोध असूनसुद्धा आजवर पक्षाने तुम्हाला मोठ्या जवाबदाऱ्या दिल्या.. पक्षाने आपणास सर्वप्रथम 1997 ला पंचायत समितीला संधी दिली, त्यात तुम्ही पराभूत झालात.
त्यानंतर आपणाकडे भाजपा तालुका सरचिटणीस पदाची जवाबदारी देण्यात आली.
2002 साली पक्षाने तुम्हाला पुन्हा पंचायत समितीत संधी दिली व ‘निवडून आणले’. 2003 ते 2005 साली तुम्हाला पक्षाने जामनेर पंचायत समितीच्या सभापती पदी आरूढ केले.
2007 साली नेरी गटातून जिल्हा परिषदेला संधी दिली परंतु त्यात तुम्ही पराभूत झाले. पुनर्वसन म्हणून 2007 मध्ये पुन्हा पंचायत समिती सदस्य म्हणून पक्षाने संधी दिली.
संघटनेत तुम्हाला भाजपा तालुकाध्यक्ष सारखे मोठे व मानाचे पद दिले.
2012 साली पुन्हा जिल्हा परिषदेला संधी दिली. यावेळेला तुम्ही निवडून आलात. 2012 ते 2017 असे सलग 5 वर्ष तुम्हाला जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद दिले. *जामनेर तालुक्याला तुमच्या रूपाने प्रथमच लाल दिव्याची गाडी मिळाली.*
तुमच्यासोबतच सौ. विद्याताईंना 2004 ते 2009 मार्केट कमिटीच्या संचालक मंडळात संधी दिली. या दरम्यान 2006 ते 2007 या काळात त्यांनी मार्केट कमिटी सभापती म्हणून काम पहिले.
यानंतर ताईंना पक्षाने जिल्हा परिषदेची सुद्धा 2017 ला संधी दिली.
आता मुदत संपलेल्या जिल्हा परिषदेत त्यांनी सदस्यपद भूषविले.
*म्हणजे गेल्या 20 वर्षांपासून अखंडपणे सरांच्या घरात सत्तेची पदे आहेत..*
*अगदी स्वप्नवत प्रवास आहे हा…*
माननीय नामदार गिरीश भाऊ महाजन विधानसभा निवडणुकीत निवडून आल्यानंतर भारतीय जनता पक्षाला जे सुगीचे दिवस तालुका व पक्षाला आले त्यात नेरी गटाचे प्रतिनिधित्व सतत सरांनी केले आणि कायमच पक्षातर्फे मान सन्मान त्यांना मिळाला.
*याला जर डावलले जाणे, विश्वासात घेतले न जाणे, अन्याय म्हणत असाल तर, सर असा अन्याय प्रत्येक भाजपा कार्यकर्त्यावर व्हायलाच पाहिजे !*
ही सर्व पदे आपणास फक्त भारतीय जनता पार्टीच्या जीवावरच मिळालीत ना ? अहो सर तुम्ही ३५ वर्षाचे तुणतुणे लावलेय, पण मेहनत घेणारे तुम्ही एकटेच आहात का ? तुमच्यासारखे असंख्य कार्यकर्ते आहेत. इतर कार्यकर्त्यापेक्षा तुम्ही खरोखरच नशीबवान !
पक्षाच्या ध्येयधोरणानुसार नवीन फळी घडविण्याची जवाबदारी आपलीच आहे. त्यासाठी तरुण रक्ताला जवाबदारी द्यावीच लागेल ना…
जिल्हा परिषदेत निवडून आल्यावर एकनाथ खडसेंशी वाद घालून गिरीषभाऊंनी तुम्हाला जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद दिले. तेव्हाच्या जामनेर येथील सभेतील तुमचे भाषण आठवले…
“जामनेर तालुक्याला पहिला लाल दिवा आज माझ्या रूपाने मिळालाय, तो पण माझे नेते गिरीष भाऊंमुळेच !
स्वतःपेक्षा कार्यकर्त्याला मोठे करणारे नेतृत्व म्हणजे गिरिषभाऊच !”
तुमच्याच कन्येने घेतलेल्या मुलाखतीत तुम्ही हा प्रवास स्वतःच्या मुखाने सांगितलेला आहे.
कदाचित गिरिषभाऊंनी तुम्हाला जिल्हाध्यक्ष बनवून तुमच्यावर केलेला अन्याय तुम्ही विसरला असाल पण मी नाही…
जिल्हा परिषद अध्यक्ष पदाच्या खुर्चीवर बसलेले असतांना भाऊंनी जामनेर तालुक्यात कामे न करण्यास सांगितल्याचे तुम्ही म्हणालात…
अहो सर, तुम्हाला तेथे काम करण्यासाठी जवाबदारी दिली होती, दगड म्हणून बसण्यासाठी नव्हे…
म्हणजे तुम्ही फक्त “सांगकामे” आहेत का ?
कैलास पालवे सारख्या निष्ठावंत कार्यकर्त्याच्या नावाने राजकारण करीत आहात, पण त्याला त्या दिवसापासून साधा फोन तरी केला का तुम्ही ? तुमचा पण सहकारी ना तो ?
अपघात झाल्यापासून ते आजच्या दिवसापर्यंत भाऊ त्याच्या संपर्कात आहेत. अपघाताच्या रात्री जळगावला रात्री २ पर्यंत भाऊ त्याच्या सोबतच होते, मुंबईला भेटले. अपघातानंतर त्याने स्वतः कार्यक्रम पूर्ण करण्याचे सहकाऱ्यांना सांगितले होते, हवे तर शहानिशा करून घ्या…
यापुढे जाऊन तुम्ही म्हणालात गिरीषभाऊ लोकांना भेटत नाही, कामे होत नाहीत…
सर, हे न पटणारे व धादांत खोटे कारण आहे पक्ष सोडायचे..
असा एक कार्यकर्ता दाखवा जो भाऊंना भेटू शकला नाही आणि ज्याचे काम झाले नाही…
गिरीषभाऊंनी कार्यकर्त्यांमध्ये कधी कसलाही भेदभाव केला नाही. कधी जातीभेद केला नाही.
तुम्हीसुद्धा हे मान्य करताच !
तालुक्यात एकही असे गाव नाही ज्या गावाला निधी भेटला नाही, विकासकामे झाली नाही. यात कसलाही भेदभाव नाही.
जामनेर तालुक्यातील सर्वच ग्रामपंचायतींचे निकाल पाहून जनता ग्रामविकास मंत्री गिरीषभाऊ महाजन यांच्याबरोबरच असल्याचे अधोरेखित झाले आहे.
ईश्र्वरबाबुजी जैन, संजयदादा गरुड, डी. के. दादा पाटील यांसारख्या दिग्गजांनी गिरीषभाऊंना आव्हान दिले परंतु ते अपयशी ठरले. आजवर गिरीषभाऊ सलग 6 वेळा आमदार झाले, याचे एकच कारण म्हणजे भाऊंनी सर्व तालुकाच परिवार मानला आहे. यात कसलाही भेदभाव झाला नाही, होणार नाही. प्रत्येकाच्या सुखा-दुःखात भाऊ सहभागी आहेत.
सर, तुमच्या मनोमन महत्त्वकांक्षा असून, पत्नी व मुलाच्या आग्रहोत्सव उमेदवारी घेणार असल्याचे सांगतात मग अन्यायाचे रडगाणे उगाचच का गाताय सर ?
*आपण जर भाजपासाठी इतकेच एकनिष्ठ होतात, तर 2019ला मुक्ताईनगरच्या नेत्याच्या सांगण्यावरून पक्षाने दिलेल्या उमेदवाराविरुद्ध आमदारकीचा फॉर्म घेतलाच कसा ?* तुम्हाला जिल्हा परिषद अध्यक्ष बनविण्यास कडाडून विरोध करणाऱ्या खडसेंच्याच इशाऱ्यावर तुम्ही आज पक्षविरोधी कार्य करीत आहात…
तेव्हाच पक्षाची ध्येयधोरणे, संघटना, शिस्त याला तुम्ही हरताळ फासला.
आणि आता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या नावाने बोटे मोडता ?
सर, भाजपा परिवार अठरा पगड जाती समुहांचा आहे. तुम्ही स्वत:च्या स्वार्थासाठी केलेले पक्षांतर हे वैचारिक गद्दारी आहे.
कालपर्यंत हिंदुत्वाच्या, शिवछत्रपतींच्या झेंड्याखाली असणारे तुम्ही आज शरद पवारांच्या मांडीवर कसे काय जाऊन बसलात ?
5 वर्षांपासून विरोधकांच्या संपर्कात असताना एकनिष्ठतेचा, ढोंगी हिंदुत्वाचा आव तुम्ही आणलात, या वैचारिक, सैद्धांतिक गद्दारीचे काही उत्तर आहे ?
सर, २०१४ ला डी. के. दादांच्या जमिनी लिहून घेणारे तेव्हाचे व्यापारी, काही भाडोत्री पत्रकार आज तुम्हाला तिकडे फितवून घेऊन गेलेत…
त्यांच्यापासून जरा जपूनच रहा…
त्यांचा इतिहास गरीबांचे गळे कापण्याचा, काळाबाजारीचा, गद्दारीचाच आहे…
त्यांना तुमच्याशी काही देणे नाही, ही व्यापारी वृत्ती आहे, गिरिषभाऊंमुळे डब्यात असलेली ही वृत्ती स्वतःच्या स्वार्थासाठी बाहेर येण्याच्या प्रयत्नात असून तुम्ही तिचे कठपुतले बनल्याचे दुःख वाटते.
आज ज्या व्यापाऱ्यांच्या दावणीला तुम्ही बांधले गेले आहात तेच व्यापारी इलेक्शन झाल्यावर तुम्हाला विकायला सुद्धा कमी करणार नाही…
आणि सर एकच सांगणे आहे,
*आमचे नेते गिरीशभाऊचं आहेत आणि राहणार…*
कृपया तुमच्या आणि तुमच्या नवीन मालकांच्या राजकीय स्वार्थासाठी आमचा वापर करू नका आणि आम्हाला गृहीत सुद्धा धरू नका…
*या माणसन्मानाला अन्याय म्हणत असाल, तर सर असा अन्याय प्रत्येक कार्यकर्त्याच्या नशिबी यावाच…*
— जामनेर तालुक्यातील एक सर्वसामान्य भाजपा कार्यकर्ता