ग्रामीण

दिलीप खोडपे सरांना पदे मिळाली त्यांच्या कर्तत्वामुळे 

दिलीप खोडपे सरांना पदे मिळाली त्यांच्या कर्तत्वामुळे

जळगाव प्रहार वृषभ इंगळे

जामनेर –जळगांव जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि भाजपचे ज्येष्ठ नेते दिलीप खोडपे सरांनी काल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला व येणारी विधानसभा निवडणुक लढवत असल्याचं जाहीर केलं. यानंतर साहजिकच ज्या भाजपमध्ये त्यांनी गेली अनेक वर्षे निष्ठेने काम केलं, पक्षासाठी अहोरात्र झटून मेहनत केली. ज्याकाळी भाजपकडे हक्काचे कार्यकर्ते नव्हते त्याकाळी खोडपे सरांनी तालुकाभरात गावोगाव फिरून कार्यकर्ते तयार केलेत, त्यांच्या सुखदुःखासाठी ते झटलेत. कधीकाळी सहकारी म्हणून काम करणारे गिरीश महाजन 1995 ला पहिल्यांदा आमदार झाले आणि जामनेर मतदारसंघात भाजपचं कमळ फुललं. गेली 30 वर्षे झालीत गिरीश महाजन मतदारसंघाचं नेतृत्व करत आहेत. आज ते राज्याचे महत्वाचे मंत्रीही आहेत. परंतु, आज मात्र त्याच भाजपमध्ये खोडपे सरांसारख्या निष्ठावंत कार्यकर्त्याला विचारात न घेता निर्णय घेतले जातात. उलटपक्षी त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्याना पक्षाकडून आडकाठी करण्यात येते, त्यांची कामे होऊ दिली जात नाही म्हणून त्यांनी कालच्या भरसभेत बोलताना ही खंत व्यक्त केली.

 

खोडपे सरांचा राष्ट्रवादी प्रवेश होऊन अजून 24 तासदेखील झालेले नाहीत. एवढ्यात त्यांच्यावर अगदी पातळी सोडून टीका भाजपकडून सुरू झालेली आहे. सरांना भाजपने पंचायत समिती सभापतीपद दिलं, जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद दिलं, पक्षात मोठी पदे दिलीत असं सांगणारे भाजपचे नेते एक गोष्ट मात्र सोयीस्कररित्या एक गोष्ट विसरतात की, त्यांना ही पदं दिलेली होती,तर त्यांच्या कर्तृत्वामुळेच दिलेली होती. कारण जर सर त्या पदांसाठी लायक नव्हते तर मग मग पक्षात अन्य मोठे नेते सुद्धा होते. त्यांना का ही पदं दिली गेली नसावीत? हा विचार त्यांनी स्वतः करणे गरजेचे आहे. ज्या माणसाने तालुक्यात कार्यकर्त्यांचं जाळं विणलं, पक्षाला सुगीचे दिवस आणण्यासाठी अहोरात्र मेहनत केली. त्या माणसाचा हा हक्कच होता हे जामनेरची जनता व्यवस्थित जाणतेच.

 

राहिला विषय सरांच्या जातीचा. तर खोडपे सर मराठा आहेत व म्हणूनच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे व ही निवडणूक जातीय समीकरणातून जिंकायची आहे असं जे कथानक भाजपकडून रचण्यात आलेलं आहे त्यात काही एक तथ्य नाही. कारण दिलीप खोडपे सर हे ‘मराठा’ समाजाचे आहेत हे भाजपच्या उतावीळ आणि उथळ नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्याना आता सरांनी भाजप सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केला तेव्हा कळलं का? याआधी सर मराठा नव्हते का? की ते भाजपमध्ये होते म्हणून ते तुम्हाला जातीयवादी दिसत नव्हते? हा प्रश्न भाजपसाठी आत्मपरीक्षणाचा आहे. ही निवडणूक एका समाजाची नाही, एका समाजाच्या अस्तित्वाची नाही तर संपूर्ण तालुक्यातील बारा-बलुतेदार व अठरा अलुतेदार बहुजन बांधवांच्या सर्वांगीण विकासाची आहे हे इथल्या सामान्य जामनेरकर जनतेला चांगलंच ज्ञात आहे. म्हणून ज्या भाजपच्या विघ्नसंतोषी प्रवृत्तीने प्रत्येक निवडणूकीत एका विशिष्ट समाजाची भीती दाखवून अन्य समाजाची मतं मिळवण्याचा प्रयत्न केला व मराठा विरुद्ध इतर बांधव असा संघर्ष तालुक्यात गेली 30 वर्षे सुरु ठेवला. त्या भाजपला जातीयवादावर बोलण्याचा नैतिक अधिकार नसल्याचं इथे नमूद करावंसं वाटतं.

 

जामनेरकर म्हणून आपली ओळख जिल्हाभरात अभिमानाने मिरवणारा इथला मतदारराजा अत्यंत भावनिक आहे. सलग 30 वर्षे त्याला भावनिक करून मतं आजचे आमदार व त्यांची उथळ भाजपची टीम मागत आहे. प्रत्येक गावात दोन गट निर्माण करून त्यांच्यात वाद वाढवण्याचा काम सत्तेच्या माध्यमातून आमदार महाशय व भाजप करत आहे. हेही सुज्ञ जामनेरकर मतदाराला माहित आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणूकीत जामनेर मतदारसंघाला जो विकासाकडे घेऊन जाण्याचा विचार व निर्धार जामनेरच्या सामान्य जनतेने केलेला आहे तोच विचार आज साक्ष देतोय की, यंदा परिवर्तन अटळ आहे. एक सुशिक्षित आणि सुसंस्कारित व्यक्ती म्हणून खोडपे सरांनी जी आपली ओळख व ख्याती जिल्हाभरात तयार केलेली आहे. तीच इथल्या जनतेला अपेक्षित आहे. म्हणून यंदाच्या निवडणूकीत स्टंटबाजी, उथळगिरी आणि भंपक राजकारणाला संपवून विकासाच्या नावावर मतं मागत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिलीप खोडपे सरांना विजयी करत जामनेरकरांचा आवाज म्हणून विधिमंडळात पाठवण्याचा निर्धार मतदारांनी केलेला आहे.

 

— एक सुज्ञ जामनेरकर. 🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}