शिवसेना (ठाकरे गट) चे राज्य संघटक राहुल चव्हाण यांनी आज ज्येष्ठ नेते शरद पवार यांची घेतली भेट
शिवसेना (ठाकरे गट) चे राज्य संघटक राहुल चव्हाण यांनी आज ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीने जामनेर विधानसभा मतदारसंघातील उमेदवारीवर मोठी चर्चा रंगली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील जागावाटपावरून चव्हाण यांनी पवार यांच्याशी चर्चा केली .
३० वर्षांपासून शिवसेना जामनेर मतदारसंघात सतत काम करत आहे, मात्र प्रत्येकवेळी या पक्षाला डावलले जात आहे. युती किंवा आघाडीमध्ये शिवसेनेला याठिकाणी न्याय मिळत नाही, अशी तक्रार चव्हाण यांनी याआधीही मांडली आहे. त्यामुळे या निवडणुकीत जामनेरची जागा ठाकरे गटासाठी राखीव ठेवावी, अशी त्यांची मागणी आहे. शरद पवार यांच्याशी झालेल्या भेटीत त्यांनी ही भूमिका ठामपणे मांडली असल्याचे सूत्रांनी सांगितले.
अपक्ष लढण्याचा इशारा
राहुल चव्हाण यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे की, शिवसेनेला जामनेरची जागा मिळाली नाही तर ते अपक्ष उमेदवारी करणार. पवार यांच्याशी झालेल्या चर्चेत या मुद्द्यावरही विचारविनिमय झाल्याचे बोलले जात आहे. शिवसेनेला जामनेरची जागा मिळावी, यासाठी पवार यांच्याकडून सकारात्मक भूमिका घेण्यात येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
महाविकास आघाडीत तणाव वाढणार?
जामनेर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसकडून दिलीप खोडपे यांना उमेदवारी देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, शिवसेना पक्षाच्या कार्यकर्त्यांनी याला विरोध दर्शवला आहे. चव्हाण यांचा पवारांशी झालेला संवाद महाविकास आघाडीतील मतभेद तीव्र करण्याची शक्यता निर्माण करत आहे. शिवसेना या जागेवर ठाम असताना राष्ट्रवादीच्या भूमिकेवर सर्वांचे लक्ष लागले आहे.
शिवसेनेला उमेदवारी मिळणार का?
राहुल चव्हाण यांच्या शरद पवारांसोबतच्या भेटीनंतर आता जामनेरच्या उमेदवारीसंदर्भात निर्णय होईल का, याची चर्चा सुरू झाली आहे. पवार यांच्या हस्तक्षेपामुळे महाविकास आघाडीतील तणाव कमी होईल का, की शिवसेनेला पुन्हा एकदा डावलले जाईल, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे.
आगामी दिवसांत निर्णय स्पष्ट
राहुल चव्हाण यांची पवारांसोबत झालेली चर्चा जामनेर विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने निर्णायक ठरू शकते. या चर्चेमुळे जामनेर मतदारसंघात उमेदवारीचा पेच सुटेल की चव्हाण अपक्ष म्हणून रिंगणात उतरणार, हे लवकरच स्पष्ट होईल.