जळगाव जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांच्या बदलीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेचा विषय
जळगाव जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांच्या बदलीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे. प्रशांत सोनवणे हे सध्या अधीक्षक अभियंता म्हणून कार्यरत आहेत. मात्र, त्यांच्या बदलीबाबत सतत गोंधळाची परिस्थिती आहे. नेमकं काय चाललं आहे, हे मंत्रालयालाही ठाऊक आहे का, असा प्रश्न उपस्थित होतो.
प्रशांत सोनवणे यांची बदली दोनदा झाली. प्रथम बदलीनंतर त्यांनी जळगावमध्येच कायमस्वरूपी नियुक्ती मिळवली. नंतर पुन्हा 2025 मध्ये त्यांची छत्रपती संभाजीनगर येथे नगरपालिकेच्या अधीक्षक अभियंता पदावर बदली झाली. या आदेशानंतर ते तातडीने मुंबईला गेले आणि काही दिवसांतच, म्हणजे 15 एप्रिलपर्यंत, बदलीला स्थगिती मिळवली.
मात्र, आता मे महिना अर्ध्यावर आला तरीही पुढील कोणताही आदेश निघालेला नाही. ना त्यांना जळगावमध्ये कायमस्वरूपी ठेवण्याचा निर्णय, ना दुसऱ्या अधिकाऱ्याला पदभार देण्याचे आदेश. त्यामुळे सोनवणे हे आजही अधीक्षक अभियंत्याची जबाबदारी सांभाळत आहेत.
सूत्रांच्या माहितीनुसार, ही स्थिती पाहता घोळ नेमका अधिकाऱ्यांचा आहे की मंत्रालयाचा, हेच स्पष्ट होत नाही. मंत्रालयाच्या प्रशासनात दिरंगाई आहे की संबंधित विभागाने मुद्दाम हा प्रकार प्रलंबित ठेवला आहे, असा संशय व्यक्त होतो आहे. ही गोंधळाची स्थिती म्हणजे प्रशासकीय निर्णयक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी बाब ठरत आहे. आदेश नसल्याने विभागही संभ्रमात असून, नेमकी जबाबदारी कुणावर आहे हे ठरवणं आता आवश्यक ठरत आहे.
15 एप्रिलनंतर स्थगिती आदेशाचा रिव्हाइज आलेला नाही. प्रक्रिया सुरू आहे, मात्र अधिकृत आदेश शासनाकडूनच यायला हवेत. माझ्या स्तरावरून कोणताही निर्णय घेता येत नाही.”
पी. आवटी , मुख्य अभियंता , सार्वजनिक बांधकाम विभाग, नाशिक


