ग्रामीण

संस्कृती आणि कल्याणकारी योजनांच्या जागरासाठी  जागतिक आदिवासी दिनाचा उत्सव नंदुरबारमध्ये- डॉ. विजयकुमार गावित

संस्कृती आणि कल्याणकारी योजनांच्या जागरासाठी

जागतिक आदिवासी दिनाचा उत्सव नंदुरबारमध्ये- डॉ. विजयकुमार गावित

 

नंदुरबार, दि. 8

आदिवासी समुदायाचे सांस्कृतिक वेगळेपण, मानवतेबद्दल असलेली असीम श्रद्धा, निसर्गाच्या संतुलनावर असलेले प्रेम आणि उत्त्युच्च प्रामाणिक, निखळ संस्कृती, परंपरांच्या गुणगौरवासोबत शासनामार्फत आदिवासी बांधवांसाठी राबवल्या जाणाऱ्या कल्याणकारी योजनांच्या जागरासाठी जागतिक आदिवासी दिनाचा कार्यक्रम नंदुरबारमध्ये आयोजित करण्यात येत असल्याचे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी केले आहे.

 

ते आज जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने आयोजित पारंपारिक शोभा यात्रेनंतर शहरातील शिवाजी नाट्यमंदिर येथे आयोजित कार्यक्रमात बोलत होते. या कार्यक्रमास जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, माजी खासदार डॉ. हिना गावित, आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी नतीशा माथूर (तळोदा), चंद्रकांत पवार (नंदुरबार) तसेच राज्यभरातून, जिल्ह्यातून आलेल्या विविध नृत्य पथकांसह अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला होता.

 

यावेळी बोलताना आदिवासी विकास मंत्री डॉ. गावित म्हणाले, जागतिक आदिवासी दिवस जगातिल समग्र आदिवासी बांधवांसाठी असामितेचा व आत्मसन्मानाचा दिवस असतो. महाराष्ट्रात हा दिवस राज्यातील वेगवेगळ्या आदिवासी बहुल जिल्ह्यात आयोजित केला जातो. यापूर्वी तो नागपूर, नाशिक, पालघर येथे आयोजित करण्यात आला होता. यंदा त्याच्या आयोजनाचे भाग्य नंदुरबार जिल्ह्याला लाभले आहे.

 

महाराष्ट्रात 47 आदिवासी उपजाती आहेत. आपल्या बोली, पेहराव वेगवेगळे असले तरी आदिवासी बांधव म्हणून आपण एक आहोत. एक रहायला हवे. दऱ्याखोऱ्यात राहणारा आदिवासी बांधव व त्याच्या प्रथा, पंरपरा कुणालाही अवगत नव्हत्या परंतु आदिवासी विकास विभागाचा मंत्री या नात्याने मी क्रिडा स्पर्धा, जागतिक आदिवासी दिवस, जनजाती दिवस भव्य-दिव्य स्वरूपात आयोजित करून राज्याला या गौरवशाली परंपरांची ओळख करून देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे, कारण आदिवासी बांधवांच्या कला व कौशल्याचे ब्रॅंडिंग दुसरेच करताना दिसत होते. आज आमचा आदिवासी बांधव संवत:च्या कलेचे स्वत:च ब्रँडिंग करेल. महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून आदिवासी बांधवांच्या उत्थानासाठी विविध योजना राबवल्या जात आहेत. या जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने योजनांचा प्रचार, प्रसार व्हावा व आदिवासी संस्कृती आणि मुल्यांचे संवर्धन व्हावे, यासाठी काल, आज आणि उद्या विविध कार्यक्रमांचे आयोजन येथे करण्यात आले आहे. त्याचबरोबर आदिवासी कलेला चालना मिळावी आणि कलेच्या माध्यमातून सृजनशील कल्पनांचे सादरीकरण व्हावे यासाठी विद्यार्थ्यांसाठी व खुल्या स्वरूपातील रांगोळी स्पर्धा, आदिवासी नृत्य स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रामसमुह, बचत गट, वन-धन केंद्र आणि इतर आदिवासी बांधवांच्या गटांनी निर्माण केलेल्या उत्पादनांचे प्रदर्शन आणि विक्रीची दालने पाहता येणार आहेत, असेही यावेळी मंत्री डॉ. गावित यांनी सांगितले.

 

शिक्षणातून समृद्ध व्हा : डॉ. सुप्रिया गावित

या कार्यक्रमातून सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना संबोधित करताना जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित म्हणाल्या, शिक्षणातून समृद्ध होण्याची संधी आदिवासी विद्यार्थ्यांना लाभली आहे, या संधीचे सोने करून आपले, कुटुंबाचे आणि समुदायाचे नाव उंच करण्यासाठी अथक परिश्रम घ्यायला हवेत. आज डीबीटी च्या निर्माण होणाऱ्या 50 टक्के अडचणी दूर झाल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून रस्ते विकासासह जलजीवन मिशनच्या माध्यमातून शुद्ध पेयजलाची योजना हाती घेण्यात येत आहे. त्याचबरोबर आदिवासी विकास विभागाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी सुरू असून या योजनांच्या लाभातून सर्वांनी जीवन समृद्ध करायला हवे.

 

आदिवासी बोली आणि संस्कृती टीकवायला हवी-डॉ. हिना गावित

जगभरातल्या बोली भाषा आज अस्तित्वाच्या शेवटच्या घटका मोजताहेत. अशा परिस्थितीत आदिवासी बोली टिकवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. मला मी आदिवासी असल्याचा अभिमान आहे. मला आदिवासी बोली बोलता येते याचाही अभिमान असून संसदेतील आदिवासी प्रतिनिधी म्हणून मला युनो मध्येही सहभागी होण्याची संधी मिळाल्याचा अभिमान असल्याचे प्रतिपादन यावेळी माजी खासदार डॉ. हिना गावित यांनी केले.

 

आज होणार मुख्य कार्यक्रम

आज ( 9 ऑगस्ट) रोजी जागतिक आदिवासी दिनाचा मुख्य कार्यक्रम तालुका क्रिडा संकुलात होणार आहे. यावेळी क्रांतिकारी आणि महापुरुषांना अभिवादन करण्याकरिता सभेचे आयोजन केलेले आहे. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल पाटील, आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित, अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम, विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवाळ, राज्यस्तरीय आदिवासी विकास आढावा समिती अध्यक्ष विवेक पंडित, जिल्हा परिषद अध्यक्षा सुप्रिया गावित, खासदार अॅड. गोवाल पाडवी, विधानपरिषद सदस्य अमरिशभाई पटेल, किशोर दराडे, आमशा पाडवी, सत्यजित तांबे, विधानसभा सदस्य अॅड. के सी. पाडवी, शिरीष नाईक, राजेश पाडवी, माजी खासदार हिना गावीत, असे अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}