Blog

मातीशी नाळ जुळलेला अभियंता; अनेक प्रकल्पांचा निर्माता… मा.श्री.व्ही डी पाटील साहेब 

जामनेर –

आपल्या लोकशाहीचे चार स्तंभ आहेत… लोकप्रतिनिधी, अधिकारी, न्यायव्यवस्था आणि मीडिया…

यात लोकप्रतिनिधी निर्णय घेतात आणि आणि अधिकारी त्याची अंमलबजावणी करतात. या व्यवस्थेत काही वेळा असे दिसून येते की अनेक राजकीय नेत्यांच्या प्रवासात, यशात काही कार्यक्षम अधिकाऱ्यांची मिळालेली जोड महत्त्वाची राहिली आहे. त्यापैकी एक अधिकारी/अभियंता म्हणून व्ही डी पाटील साहेबांचे नाव घ्यावे लागेल.

मॅनेजमेंटच्या शास्त्रात एक संकल्पना आहे, “Right Man At Right Place”

शासकीय नोकरीत कमी अधिकाऱ्यांच्या नशिबात असा योग जुळून येतो… आला तरी तो किती काळ टिकेल याची शाश्वती नसते. सत्ता बदलली कि अनेकांचे फासे उलटे पडतात.. पण याला व्ही डी पाटील साहेब अपवाद आहेत. १९८८ च्या सुमारास जामनेरला साहेबांनी उप अभियंता म्हणून सिंचन उप विभागाची धुरा सांभाळली. १९९५ ला सेना-भाजपचे सरकार सत्तेत असतांना भाजपचे एकनाथराव खडसे जलसंपदा मंत्री होते आणि त्यांच्या काळात तापी खोरे विकास महामंडळाची निर्मिती झाली, यात व्ही डी पाटील साहेबांची भूमिका महत्त्वाची होती. जामनेर मधून भाजपचे प्रथमच आमदार झालेले गिरीषभाऊ महाजन आणि पाटील साहेब सुद्धा जामनेरचे, त्यामुळे जामनेर तालुक्यात सिंचनाच्या अनेक प्रकल्पांना मंजुरी मिळाली आणि कामे सुरू देखील झाली. १९९९ ला एकनाथराव खडसे आणि गिरीषभाऊ महाजन पुन्हा निवडून आले पण राज्यात सरकार काँग्रेस-राष्ट्रवादीचे आले. तेव्हा खडसे महाजन यांच्या मर्जीतला अधिकारी म्हणून पाटील साहेबांची बदली करावी म्हणून राष्ट्रवादीचे नेते, जामनेरचे ईश्वरबाबूजी जैन यांच्याकडे काही कार्यकर्त्यांनी मागणी केली. परंतु एक अभ्यासू आणि कामसू अधिकारी आपल्याला हवा आहे आणि आता आपण त्यांच्याकडून आपली कामे करून घेऊ असे म्हणून बाबूजींनी पाटील साहेबांच्या बदलीची मागणी फेटाळून लावली.

जामनेर जवळील पळासखेडा येथील शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या, जामनेर सारख्या खेड्यात शिकून नंतर स्थापत्य अभियांत्रिकीची पदवी घेऊन शासनात जलसंपदा खात्यात उप अभियंता म्हणून कारकिर्दीची सुरवात करणारा हा सामान्य माणूस पुढे आपल्या कर्तृत्वाने असामान्य श्रेणीत गणला जातो, हजारो कोरडवाहू शेतकऱ्यांच्या आयुष्यात बदल घडवतो, अधीक्षक अभियंता म्हणून स्वेच्छा निवृत्ती घ्यायला लावून ज्याला माहिती आयुक्त म्हणून जबाबदारी दिली जाते… हा थक्क करणारा आणि तितकाच प्रेरणादायी प्रवास आहे वसंत दत्तात्रय तथा व्ही डी पाटील साहेबांचा.

शेतकरी कुटुंबाची पार्श्वभूमी असल्याने, बळीराजाच्या समस्यांची जाण मुळातच असल्याने बळीराजाचे हित डोळ्यासमोर ठेवून अभियंता/अधिकारी म्हणून मिळालेल्या अधिकारांचा उपयोग जास्तीतजास्त जमीन ओलिताखाली कशी येईल याचा कायम ध्यास.. आणि त्या ध्यासपोटी.. स्वयंप्रेरणेने आपल्या जामनेर तालुक्यातील नद्या नाल्यांचा अभ्यास करून, जिथे शक्य आहे तिथे पाणी अडवण्यासाठी बंधारा, साठवण तलाव, एम आय टँक, किंवा धरण… जे जे शक्य असेल त्याचा प्रकल्प अहवाल तयार करणे.. बरे असे प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी कुठलाही निधी नसतांना, आपल्या अधिनस्थ कर्मचारी, अभियंता यांच्याकडून असे प्रकल्प अहवाल तयार करणे म्हणजे लष्कराच्या भाकऱ्या भाजण्याचे काम… पण साहेबांपुढे बोलेल कोण? केवळ साहेबांच्या शब्दाखातर असे अनेक प्रकल्प अहवाल तयार करण्यात आले. योगायोगाने सुधाकरराव नाईक मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी जलसंधारण खात्याची निर्मिती केली… त्या खात्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद केली… त्यानंतर अनेक लोकप्रतिनिधी/अधिकारी जागृत झाले आणि प्रकल्प अहवाल तयार करण्याच्या कामात गुंतले… तोवर व्ही डी पाटील साहेबांचे प्रकल्प अहवाल मंजुरीच्या प्रक्रियेत आले होते… साहजिकच जलसंधारण खात्यात जिल्ह्यासाठी मंजूर निधी सर्वाधिक मिळाला तो जामनेरला; सर्वप्रथम जे प्रकल्प मंजूर झाले ते व्ही डी पाटील साहेबांनी तयार केलेले जामनेर तालुक्यातील होते.

*कमानी तांडा प्रकल्प*

नदीचा प्रवाह अडवून, gravity ने अनेक लहान मोठ्या irrigation प्रकल्प पावसाळ्यात वाहून जाणाऱ्या पाण्याने भरून घेणे.. अशा प्रकारचा जिल्ह्यातील पहिल्या प्रकल्पाची संकल्पना, अंदाजपत्रक, निविदा आणि प्रत्यक्ष काम पूर्ण करणे… अर्थात सब कुछ व्ही डी पाटील असे ज्या प्रकल्पाविषयी म्हणता येईल तो म्हणजे जामनेर तालुक्यातील कमानी तांडा प्रकल्प. .

केवळ साहेबांच्या शब्दाखातर कुठलीही कायदेशीर प्रक्रिया करण्याआधीच सिंचन प्रकल्पासाठी आपली जमीन दिलेले अनेक शेतकरी आजही आपल्याला आढळतील.

अजिंठा डोंगराच्या पायथ्याशी असलेला जामनेर तालुका नाले आणि नद्यांनी समृद्ध आहे. पाणी अडवण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात साईट्स उपलब्ध होत्या. त्यात पाटील साहेब कार्यकारी अभियंता आणि खडसे साहेब आणि गिरीषभाऊ यांच्याकडे सोपविण्यात आलेले जलसंपदा खाते असा योग जुळून आल्याचा सर्वाधिक लाभ जामनेर तालुक्याला झाला यात काही नवल नाही.

शासनात नियम, कायदे सर्वांसाठी समान आहेत, असतात.. पण त्या पलीकडे जाऊन जनहितार्थ काही अधिकारी आपले अधिकार वापरून performance देतात तेव्हा शासनाविषयी ते सकारात्मक लोकमत तयार करत असतात.

शासनाने त्यांचा अभियंता गौरव पुरस्कार देऊन यथोचित गौरव केला आहे. या पुरस्कारानंतर तत्कालीन विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांच्या अध्यक्षतेखाली व (स्व.) ना धों महानोर यांच्या उपस्थितीत जामनेरला साहेबांचा नागरी सत्कार करण्यात आला होता.

बोदवड सिंचन योजनेची संकल्पना मांडून, राष्ट्रपती भवनात तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांना त्याचे प्रेझेंटेशन देऊन केंद्र आणि राज्याच्या सहकार्याने एक मोठी योजना मंजूर करण्यात साहेबांचे परिश्रम मोलाचे आहेत.

सातपुडा आणि तापी मधील पट्ट्यात भूगर्भातील खालावलेली चिंताजनक पाण्याच्या पातळीवर मेगा रिचार्ज योजनेसाठी मुंबई, दिल्लीपर्यंत पाठपुरावा करून योजना मंजुरीसाठी मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस, राज्य आणि केंद्राचे जलसंपदा मंत्री अनुक्रमे गिरीषभाऊ महाजन आणि श्रीमती उमा भारती यांच्यासह संयुक्त हवाई पाहणी करून योजनेचे महत्व पटवून देण्यात पाटील साहेबांचा मोठा वाटा आहे.

धुळ्याच्या पाणीपुरवठा समस्येवर एक्सप्रेस कॅनॉल ने पाणी आणण्याची संकल्पना साहेबांचिच.

याशिवाय अनेक चाकोरीबाहेरील कामे स्वयंस्फूर्तीने केल्याचा इतिहास सर्वांना माहीत आहे. जसे की राज्यपाल म्हणून व नंतर राष्ट्रपती म्हणून प्रतिभाताई पाटील यांचा जळगावात झालेला नागरी सत्कार, बोदवड सिंचन योजनेचे राष्ट्रपती, राज्यपाल, मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत केलेले भूमिपूजन, २००९ च्या लोकसभा निवडणुकीत मतदानाचे ऑनलाईन रेपोर्टिंग… अशी विविधांगी कामे करतांना त्यांच्यातील टीम लीडर हा गुण प्रत्यक्ष अनुभवायला ज्यांना मिळाला त्यातील मी एक नशीबवान आहे.

२०१४ ला राज्यात काँग्रेस राष्ट्रवादी सरकारची मुदत संपत असताना राज्यातील माहिती आयुक्तांची अनेक वर्षांपासून ३–४ रिक्त पदे भरायची होती. निवड समितीत मुख्यमंत्री श्री पृथ्वीराज चव्हाण, उप मुख्यमंत्री श्री अजित पवार आणि विरोधी पक्षनेता श्री एकनाथराव खडसे हे होते. सेवानिवृत्त होण्यास तीन महिने बाकी असताना साहेबांना दादांनी आणि नाथा भाऊंनी स्वेच्छानिवृत्ती घ्यायला लावून निवडणूक आचारसंहिता लागण्याआधी माहिती आयुक्त म्हणून साहेबांना नागपूर येथे नियुक्ती दिली. तिथेदेखील त्यांनी आपल्या निर्णयक्षमतेचा उपयोग करत हजारो प्रलंबित प्रकरणांचा त्वरेने निपटारा करून एक इतिहास घडवला.

साहेबांच्या या प्रवासात सौ. भारती ताईंनी सक्षमपणे आणि प्रेमळपणे सांभाळलेली कुटुंबाची जबाबदारी याचा महत्वाचा वाटा आहे. कौटुंबिक स्तरावर पत्नी, मुलगी, जावई, मुलगा आणि सून, नातवंडे यांच्यात समाधानाने रममाण झालेल्या साहेबांचे तिसऱ्या इनिंग मध्येही समाजकार्य निरंतर सुरु आहे. फावल्या वेळात समाजातील उपवर मुला मुलींचे विवाह जुळवणे हे कार्य असो, नवीन उद्योजक असो, नवीन जॉईन झालेले अभियंता असो, सर्वांना मार्गदर्शन करणे, अडचणी सोडवणे, वाचन करणे यात साहेब आजही full to busy आहेत.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}