राज्यस्तरीय कला-क्रीडा महोत्सवात जळगावच्या अधिकाऱ्यांची चमकदार कामगिरी; योगेश पाटील साहेब यांचे दुहेरी यश, नाशिक विभागाचे सांघिक वर्चस्व




राज्यस्तरीय कला-क्रीडा महोत्सवात जळगावच्या अधिकाऱ्यांची चमकदार कामगिरी; योगेश पाटील साहेब यांचे दुहेरी यश, नाशिक विभागाचे सांघिक वर्चस्व —
वृषभ सदाशिव इंगळे –
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय कला व क्रीडा स्पर्धा दिनांक १९ व २० फेब्रुवारी २०२६ रोजी अत्यंत उत्साहात आणि दिमाखात पार पडल्या. राज्यभरातून मोठ्या संख्येने अधिकारी-कर्मचारी सहभागी झाल्याने या स्पर्धांना महोत्सवाचे स्वरूप प्राप्त झाले होते.
या स्पर्धांमध्ये वैयक्तिक गटात योगेश पाटील साहेब यांनी उल्लेखनीय कामगिरी करत समाज कल्याण विभागाचा गौरव वाढविला. त्यांनी टेबल टेनिस प्रकारात उपविजेतेपद पटकावले, तर कविता वाचन स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळवून क्रीडा व कला या दोन्ही क्षेत्रांतील आपले नैपुण्य सिद्ध केले.
विशेष म्हणजे, जळगाव येथील समाज कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी या स्पर्धांमध्ये सक्रिय सहभाग घेत एकसंघपणे विभागाचे प्रतिनिधित्व केले. वैयक्तिक यशासोबतच सांघिक पातळीवरही जळगाव विभागाचा सहभाग लक्षवेधी ठरला.
दरम्यान, नाशिक विभाग संघाने सांघिक स्पर्धांमध्ये आपले वर्चस्व सिद्ध करत व्हॉलीबॉल आणि रस्सीखेच या दोन्ही प्रकारांत विजेतेपद मिळविले. या विजयी संघात समाज कल्याण विभाग, जळगाव येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा महत्त्वपूर्ण सहभाग होता. संघभावना, शिस्त आणि उत्कृष्ट समन्वयाच्या जोरावर नाशिक विभागाने अंतिम फेरीत प्रतिस्पर्ध्यांवर मात केली.
राज्यभरातून सहभागी झालेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विविध सांस्कृतिक सादरीकरणे, कविता वाचन, तसेच क्रीडा प्रकारांमध्ये सादर केलेले कौशल्य उपस्थितांना भारावून टाकणारे ठरले. प्रशासकीय जबाबदाऱ्यांसोबतच कला-क्रीडा क्षेत्रातही अधिकारी व कर्मचारी किती सक्षम आहेत, हे या राज्यस्तरीय स्पर्धांमधून अधोरेखित झाले.
या स्पर्धांमुळे विभागीय पातळीवर आपुलकी, मैत्री आणि संघभावना अधिक दृढ झाली असून, आगामी काळात अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा उपक्रमांचे आयोजन अधिक व्यापक स्तरावर करण्यात यावे, अशी अपेक्षा सहभागींकडून व्यक्त करण्यात आली.



