शिक्षण विभाग जि. प. नंदुरबार अंतर्गत कार्यरत प्राथमिक शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणी (चट्टोपाध्याय) लाभ मंजूर, प्रहार शिक्षक संघटनेच्या पाठपुराव्याला यश.

शिक्षण विभाग जि. प. नंदुरबार अंतर्गत कार्यरत प्राथमिक शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणी (चट्टोपाध्याय) लाभ मंजूर, प्रहार शिक्षक संघटनेच्या पाठपुराव्याला यश.
महाराष्ट्र राज्य प्रहार शिक्षक संघटनेमार्फत जिल्हा मार्गदर्शक संजय गावीत,जिल्हाध्यक्ष गोपाल गावीत, जिल्हा कार्याध्यक्ष विश्वास देसाई यांचेकडून जिल्हा परिषद नंदुरबार मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सावनकुमार यांना निवेदन सादर करण्यात आले होते. प्रहार शिक्षक संघटनेमार्फत आदिवासी पारंपारिक तुरवाद्य आंदोलन करण्यात आलेले होते. शिक्षण विभाग जिल्हा परिषद, नंदुरबार अंतर्गत कार्यरत प्राथमिक शिक्षकांना १३ सप्टेंबर २०२४ रोजी आयोजित समितीच्या बैठकीत वरिष्ठ वेतनश्रेणी (चट्टोपाध्याय) लाभ मंजूर करण्यात आला आहे. प्राथमिक शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणी व निवडश्रेणी मंजूरीकामी शासन निर्णय ११ फेब्रुवारी, १९९१नुसार त्रिसदस्यीय समिती स्थापन करण्यात आलेली असून समितीचे अध्यक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी, सचिव शिक्षणाधिकारी (माध्यमिक) व समिती सदस्य शिक्षणाधिकारी (प्राथमिक) आहेत. प्रस्तावित करण्यात आलेल्या ६२ प्रस्तावांपैकी ६० प्रस्ताव प्राथमिक शिक्षकांचे तर २ प्रस्ताव केंद्रप्रमुखांचे होते. शासन नियमानुसार विहीत निकषांची पूर्तता असणारे कागदपत्र प्रस्तावात सादर करणा-या एकूण ५६ प्राथमिक शिक्षक व २ केंद्रप्रमुखांना वरिष्ठ वेतनश्रेणी मंजूर करण्यात आली असून कागदपत्र अपूर्ण असणा-या ४ प्रस्तावांना तूर्तास मान्यता देण्यात आलेली नाही.
वरिष्ठ वेतनश्रेणी मंजूर करण्याच्या प्रक्रीयेत सावन कुमार मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रविण अहिरे शिक्षणाधिकारी (माध्यमिक) व श्रीम. वंदना वळवी शिक्षणाधिकारी (प्राथमिक), निलेश लोहकरे प्राथमिक उपशिक्षणाधिकारी, डॉ. युनूस पठाण, उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक शिक्षण विभागाचे सहाय्यक प्रशासन अधिकारी सुभाष मारनर, कनिष्ठ प्रशासन अधिकारी एस.पी. जाधव व सतिष गावीत तसेच वरिष्ठ सहाय्यक सुनिल गिरी यांनी परिश्रम घेतले आहे. प्रहार शिक्षक संघटनेमार्फत प्रशासनाचे आभार व्यक्त केले आहेत. नंदुरबार जिल्ह्यातील वाडी, वस्ती, पाड्यातील शिक्षक बंधू भगिनी यांनी प्रशासनाचे व प्रहार शिक्षक संघटनेचे आभार मानले आहे.


