प्रहार शिक्षक संघटनेचे बीडीओ विकास राठोड यांना निवेदन, कंत्राटी शिक्षक सात महिन्यांपासून मानधनाविना; शिक्षक झाले कर्जबाजारी

प्रहार शिक्षक संघटनेचे बीडीओ विकास राठोड यांना निवेदन, कंत्राटी शिक्षक सात महिन्यांपासून मानधनाविना; शिक्षक झाले कर्जबाजारी
नंदुरबार दि. ५ नंदुरबार जिल्ह्यातील पेसा क्षेत्रातील दुर्गम भागातील शाळेत अध्यापनाचे कार्य करणाऱ्या कंत्राटी शिक्षकांना मागील सात महिने कालावधीपासून मानधनापासून वंचित आहेत. शिक्षण आयुक्त व शिक्षण संचालकांच्या आदेशाने पेसा क्षेत्रातील शाळांमध्ये कंत्राटी पद्धतीने तात्पुरत्या स्वरूपात शहादा तालुक्यात ४६ शिक्षक म्हणून उमेदवारांना नियुक्ती दिलेली आहे. आदेशात नमूद केल्यानुसार दरमहा २० हजार रुपये मानधन देय आहे. मात्र या ४६ कंत्राटी शिक्षकांना नियुक्तीपासून आजतागायत कोणतेही मानधन अदा करण्यात आले नाही. या शिक्षकांना नंदुरबार जिल्हा परिषदेतर्फे पाच सप्टेंबर २०२४ रोजी आदेश प्राप्त झाला व ते शाळेवर रुजू झाले असून, आजपावेतो त्यांना मानधन मिळालेले नाही. याकरिता शहादा तालुक्याचे गटविकास अधिकारी विकास राठोड, तसेच गटशिक्षणाधिकारी डॉ. योगेश सावळे यांना महाराष्ट्र राज्य प्रहार शिक्षक संघटना शहादा तालुका अध्यक्ष तुकाराम अलट त्यांच्या नेतृत्वाखाली शहादा तालुक्याचे गटविकास अधिकारी विकास राठोड साहेब त्यांच्याशी सविस्तर चर्चा करण्यात आली. चर्चेअंती १४ प्राथमिक शिक्षकांचे एक महिन्याचे मानधन तालुक्यास प्राप्त झाले आहे अशी माहिती प्रहार शिक्षक संघटनेस देण्यात आली. सदरचे मानधन त्यांना तात्काळ अदा करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले. उर्वरित शिक्षकांच्या मानधनासाठी जिल्हास्तरावर यादी निहाय पाठपुरावा करण्यात येईल असे बिडीओ विकास राठोड यांनी सांगितले. याप्रसंगी मंदाना केंद्र संघटक जगन वसावे, परिवर्धा केंद्र संघटक निलिमा भिमसिंग वसावे, रायसिंग पावरा, ज्योती विजयसिंह पाडवी, शीलवान रावजी गावित, सुदाम कालुसिंग ठाकरे, नितीन सुकलाल कोकणी, सुरेश करम कोकणी, अमरावती अर्जुन वळवी आदी शिक्षक बंधू भगिनी उपस्थित होते. पेसा क्षेत्रातील दुर्गम भागातील शाळेत अध्यापनाचे कार्य करणाऱ्या मानधन व कंत्राटी शिक्षकांना मागील सात महिने अधिक कालावधीपासून मानधनापासून वंचित ठेवणे अनाकलनीय, अन्यायकारक आणि अमानवी असल्याची महाराष्ट्र राज्य प्रहार शिक्षक संघटनेची ठाम धारणा आहे. नंदुरबार जिल्हा परिषदेकडे पाठपुरावा करण्यात येणार आहे. उर्वरित कंत्राटी शिक्षक मानधन मिळाले नाही, याकरिता प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हा मार्गदर्शक संजय गावीत, जिल्हाध्यक्ष गोपाल गावीत, जिल्हा कार्याध्यक्ष विश्वास देसाई यांच्या नेतृत्वात मुख्य कार्यकारी अधिकारी सावनकुमार व प्राथमिक शिक्षणाधिकारी वंदना वळवी यांना निवेदनाद्वारे मागणी करण्यात येत आहे. ७ महिन्याचे एकत्रित मानधन देण्याची मागणी या प्रहार शिक्षक संघटनेमार्फत करण्यात येत आहे.


