कर्तव्यदक्ष गट विकास अधिकारी श्रीकृष्ण इंगळे साहेब यांच्याकडून कठोर कारवाईची अपेक्षा; मासिक दैनंदिनी प्रकरणी TA-DA वसुलीची मागणी
मासिक दैनंदिनी न सादर करता भत्ते घेतल्याची चर्चा; माहिती वेळेत न देणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवरही जबाबदारी निश्चित करण्याची मागणी

जामनेर – प्रतिनिधी
जामनेर : पंचायत समिती जामनेर अंतर्गत कार्यरत काही ग्रामपंचायत अधिकाऱ्यांकडून मासिक दैनंदिनी सादर न करता प्रवास भत्ता (TA) व महागाई भत्ता (DA) घेतल्याच्या मुद्द्याची चर्चा सध्या प्रशासन व नागरिकांमध्ये सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी श्रीकृष्ण इंगळे यांच्या कर्तव्यदक्ष आणि नियमपालनाच्या भूमिकेमुळे या प्रकरणात योग्य ती कायदेशीर व प्रशासकीय कारवाई होईल, अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिक व्यक्त करत आहेत.
आपले सरकार पोर्टलवर दाखल झालेल्या ऑनलाईन तक्रारीच्या अनुषंगाने पंचायत समिती जामनेर कार्यालयाकडून दि. ०२ मार्च २०२६ रोजी संबंधित अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली आहे. तसेच मासिक दैनंदिनी सादर न करणाऱ्या अधिकाऱ्यांचा कायमस्वरूपी प्रवास भत्ता बंद करण्यात आल्याचे प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे. या माध्यमातून प्रशासनाने प्राथमिक पातळीवर विषयाची दखल घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.
मात्र प्रचलित शासन नियमांनुसार अधिकारी मासिक दैनंदिनी सादर न करता प्रवास भत्ता व महागाई भत्ता घेत असल्यास तो आर्थिक लाभ नियमबाह्य ठरू शकतो. त्यामुळे ज्या कालावधीत मासिक दैनंदिनी सादर करण्यात आलेली नाही त्या कालावधीत संबंधित ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी घेतलेल्या TA-DA रकमेची नियमांनुसार वसुली करणे आवश्यक असल्याचे मत जाणकारांकडून व्यक्त केले जात आहे.
प्राथमिक चर्चेनुसार काही प्रकरणांमध्ये दोन महिने, सहा महिने किंवा त्याहून अधिक कालावधीपर्यंत मासिक दैनंदिनी सादर न झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या संदर्भातील कागदपत्रांची पडताळणी करून संबंधित प्रकरणांमध्ये आर्थिक वसुली करण्यात आल्यास शासनाच्या निधीचे संभाव्य नुकसान टाळता येऊ शकते.
दरम्यान, इतक्या महत्त्वाच्या विषयाची माहिती पंचायत समिती कार्यालयातील संबंधित जबाबदार अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांनी वरिष्ठांच्या निदर्शनास वेळेत का आणली नाही, हा देखील गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे. प्रशासनातील पारदर्शकता टिकवण्यासाठी ही बाब वरिष्ठांना वेळेत न कळविणाऱ्या संबंधित अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावरही आवश्यक ती प्रशासकीय कार्यवाही करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
पंचायत समिती जामनेर प्रशासन हे शिस्तबद्ध व जबाबदार कार्यपद्धतीसाठी ओळखले जाते. विशेषतः गट विकास अधिकारी श्रीकृष्ण इंगळे यांच्या नेतृत्वाखाली अनेक प्रशासकीय विषयांमध्ये नियमबद्ध निर्णय घेण्यात आले आहेत. त्यामुळे या प्रकरणातही संपूर्ण बाबींची सखोल चौकशी करून दोषी आढळणाऱ्या अधिकाऱ्यांकडून नियमबाह्यरीत्या घेतलेल्या सर्व रकमेची वसुली करणे तसेच संबंधित प्रशासकीय त्रुटींवर योग्य ती कारवाई करणे अपेक्षित असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
या संदर्भात आवश्यक असल्यास स्वतंत्र अधिकाऱ्यामार्फत चौकशी नेमून संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष तपासणी करण्यात यावी, अशी मागणीही पुढे येत आहे. आता गट विकास अधिकारी पातळीवर कोणती ठोस व नियमसंगत कार्यवाही केली जाते, याकडे जामनेर तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.


