जामनेरात माजी उपअभियंत्याची समांतर सत्ता; कंत्राटदारीत स्वार्थ अन् गरिबांचे प्रश्न प्रलंबित! “आदरणीय भाऊ, खांदेपालट करा, नव्या शिलेदारांना संधी द्या”; जामनेरकरांची मा. मंत्री महोदयांना भावनिक साद
जामनेरात माजी उपअभियंत्याची समांतर सत्ता; कंत्राटदारीत स्वार्थ अन् गरिबांचे प्रश्न प्रलंबित! “आदरणीय भाऊ, खांदेपालट करा, नव्या शिलेदारांना संधी द्या”; जामनेरकरांची मा. मंत्री महोदयांना भावनिक साद
जामनेर:
राज्याचे संकटमोचक आणि जामनेरच्या जनतेचे ‘विठ्ठल’ म्हणून ओळखले जाणारे मा. मंत्री श्री. गिरीशभाऊ महाजन अहोरात्र जनतेच्या सेवेत आणि राज्याच्या कारभारात व्यग्र आहेत. मात्र, त्यांच्या या वाढलेल्या जबाबदाऱ्यांचा गैरफायदा घेत एका माजी उपअभियंत्याने जामनेरात स्वतःलाच ‘आमदार’ समजण्यास सुरुवात केली आहे. या व्यक्तीच्या बेकायदेशीर हस्तक्षेपामुळे आणि प्रशासकीय मनमानीमुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली असून, आता थेट जामनेरकरांनीच त्यांचे लाडके नेते, मा. नामदार गिरीशभाऊंना साद घालत स्थानिक पातळीवर तातडीने ‘खांदेपालट’ करण्याची आग्रही मागणी केली आहे.
प्रशासकीय कामकाजात अनधिकृत दबाव अन् कंत्राटदारीत सहभाग:
हा माजी उपअभियंता शासकीय कार्यालयांमध्ये जाऊन अधिकाऱ्यांवर अनधिकृत दबाव आणत असून, प्रशासकीय कामकाजात त्याचा सातत्याने बेकायदेशीर हस्तक्षेप सुरू आहे. गरिबांचे आणि सर्वसामान्यांचे प्रशासकीय प्रश्न तातडीने मार्गी लावण्याऐवजी, ते जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवून अडवणूक केली जात आहे. सूत्रांनी दिलेल्या खात्रीलायक माहितीनुसार, हा माजी उपअभियंता आता स्वतःच विविध विकासकामे आणि कंत्राटे मिळवण्यात सक्रिय झाला आहे. प्रशासकीय सेवेचा अनुभव असलेल्या व्यक्तीने अशा प्रकारे राजकीय ओळखीचा गैरवापर करून थेट कंत्राटदारीत उतरणे, हा उघडपणे ‘हितसंबंधांचा संघर्ष’ (Conflict of Interest) आणि अधिकारांचा गैरवापर ठरतो.
”आदरणीय भाऊ, आमच्या वेदना तुम्हाला कळतात...”
राज्याचे मा. मंत्री श्री. गिरीशभाऊ महाजन हे राज्याच्या विकासाच्या कामात तहान-भूक विसरून राबत असतात. मात्र, जेव्हा ते जामनेरला आपल्या घरी परततात, तेव्हा त्यांच्या घराबाहेर याच त्रस्त आणि न्याय न मिळालेल्या नागरिकांची मोठी गर्दी उसळते. स्थानिक पातळीवरील यंत्रणेने आणि या माजी उपअभियंत्याने जी कामे मार्गी लावणे अपेक्षित होते, ती कामे जाणीवपूर्वक अडवली गेल्याने अखेर मा. मंत्री महोदयांनाच त्यांच्या विश्रांतीचा वेळ मोडून या सर्व प्रकरणांची स्वतः जातीने दखल घ्यावी लागते.
यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना नागरिक म्हणतात, “आदरणीय भाऊ, जेव्हा तुम्ही घरी आल्यावर आमच्या डोळ्यात बघता, तेव्हा तुम्हाला आमच्या वेदना आणि खऱ्या समस्या नक्कीच कळतात. तुमच्या हसमुख चेहऱ्याकडे बघितले की आम्ही आमचे सगळे दुःख विसरतो.”
”निष्ठावान शिलेदारांना संधी द्या, आपला किल्ला अधिक भक्कम होईल!”
गरिबांची कामे अडवून स्वतःची तुंबडी भरणारे आणि प्रशासनात दहशत बसवणारे हे लोक मा. नामदार श्री. गिरीशभाऊंच्या स्वच्छ आणि लोकाभिमुख प्रतिमेला काळिमा फासत आहेत. त्यामुळे आता जनतेच्या सहनशीलतेचा अंत झाला असून त्यांनी थेट आपल्या लाडक्या नेत्याला साद घातली आहे.
”मा. भाऊ, तुमचे इतरही अनेक निष्ठावान आणि प्रामाणिक शिलेदार अजून आहेत. त्यांना एकदा संधी देऊन बघा, आपला हा किल्ला नक्कीच अजून मोठा आणि भक्कम होईल. त्यामुळे या मुजोर प्रवृत्तींना बाजूला सारून आता तातडीने खांदेपालट करा,” अशी अत्यंत कळकळीची विनंती जामनेरकर जनता मा. मंत्री महोदय श्री. गिरीशभाऊ महाजन यांच्याकडे करत आहे.