जामनेरला मिळणार आधुनिक न्यायालयीन संकुल; ७७.६५ कोटींच्या भव्य इमारतीचा आराखडा तयार

जामनेरला मिळणार आधुनिक न्यायालयीन संकुल; ७७.६५ कोटींच्या भव्य इमारतीचा आराखडा तयार
जामनेर : तालुक्याच्या न्यायव्यवस्थेला आधुनिक स्वरूप देण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले असून जामनेर येथे नवीन न्यायालयीन संकुल उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तब्बल ७७ कोटी ६५ लाख रुपयांच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा आराखडा तयार करण्यात आला असून राज्य शासनाकडे निधी प्रस्तावही सादर करण्यात आला आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून जुनी व अपुरी पडत असलेली न्यायालयाची इमारत बदलण्याची मागणी होत होती. सुमारे ४५ वर्षांपूर्वी उभारण्यात आलेल्या विद्यमान इमारतीत वाढते न्यायालयीन कामकाज सांभाळताना अनेक अडचणी निर्माण होत होत्या. कोर्ट हॉलची कमतरता, पार्किंगची अपुरी व्यवस्था, वकिलांसाठी स्वतंत्र जागेचा अभाव तसेच तांत्रिक सुविधांची कमतरता यामुळे नवीन इमारतीची गरज अधिक तीव्रतेने जाणवत होती.
प्रस्तावित आराखड्यानुसार चार मजली आधुनिक न्यायालयीन इमारत उभारण्यात येणार आहे. या संकुलात अत्याधुनिक कोर्ट हॉल, वकिलांसाठी स्वतंत्र कक्ष, न्यायाधीशांसाठी सुविधा, लिफ्ट व्यवस्था, प्रशस्त प्रतीक्षागृह, सुसज्ज वाहनतळ आणि नागरिकांसाठी आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. तसेच न्यायालयीन कामकाज अधिक वेगवान व पारदर्शक करण्यासाठी आधुनिक तांत्रिक यंत्रणांचाही समावेश करण्यात येणार आहे.
प्रशासकीय मान्यता व निधी मंजुरीनंतर प्रत्यक्ष बांधकामास प्रारंभ होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. नवीन न्यायालयीन संकुलामुळे जामनेर तालुक्यासह परिसरातील नागरिकांना अधिक सक्षम आणि सुलभ न्यायसेवा मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
या प्रकल्पासाठी मंत्री गिरीश महाजन यांनी विशेष पाठपुरावा केल्याचे सांगितले जात असून त्यांच्या प्रयत्नांमुळेच या प्रकल्पाला गती मिळाल्याची चर्चा आहे. नवीन न्यायालयीन संकुलामुळे जामनेर शहराच्या विकासातही महत्त्वपूर्ण भर पडणार असल्याचे मानले जात आहे.


