जामनेर येथे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक मनोहर पाटील यांचा सेवानिवृत्ती सोहळा उत्साहात संपन्न…


जामनेर येथे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक मनोहर पाटील यांचा सेवानिवृत्ती सोहळा उत्साहात संपन्न…
जामनेर : येथील सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक मनोहर पाटील यांच्या सेवानिवृत्ती निमित्त आयोजित सत्कार व गौरव सोहळा मोठ्या दिमाखात आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी पोलिस उपअधीक्षक श्री. प्रभाकर रायते हे होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी सेवानिवृत्तीनंतरचा काळ परिवारासोबत घालवताना समाजसेवेतही सक्रिय राहण्याचे आवाहन केले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आदर्शाखाली जनतेची सेवा करत समाजाच्या दुःखात सहभागी होणे हेच खरे कार्य असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते छत्रपती शिवाजी ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष श्री. अशोक शिंदे यांनी आपल्या भाषणात छत्रपती शिवाजी महाराजांना घडविण्यामागील राजमाता जिजाऊंचे संस्कार आणि स्वराज्याच्या विचारांची प्रेरणा यावर भाष्य केले. शिवरायांनंतरही औरंगजेबाविरुद्धचा लढा महाराष्ट्राने स्वराज्याच्या विचारांनीच कायम ठेवला, असे सांगत त्यांनी उपस्थित महिलांना भावी पिढीमध्ये स्वराज्यनिष्ठ विचार रुजविण्याचे आवाहन केले.

मनोहर पाटील यांचे कार्य समाजातील अंतिम घटकापर्यंत पोहोचले असून त्यांच्या कुटुंबाचे योगदानही विविध सामाजिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण राहिले आहे. त्यामुळेच या कार्यक्रमास मोठ्या प्रमाणात जनसमुदाय उपस्थित असल्याचे मान्यवरांनी नमूद केले.
यावेळी गरीब कुटुंबातील होतकरू युवक राहुल कुमावत यांनी पोलिस उपनिरीक्षक (PSI) पदाला गवसणी घातल्याबद्दल त्यांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. साक्षात वानर हनुमान प्रतिष्ठान व आझाद मित्र मंडळाच्या वतीनेही त्यांचा गौरव करण्यात आला.
यावेळी राहुल चव्हाण यांनी आपल्या मनोगतात मनोहर पाटील यांच्या ३२ वर्षांच्या निरंतर पोलिस सेवेचे कौतुक करताना “एखाद्या कार्यात स्वतःला पूर्णपणे झोकून देणे म्हणजे त्या वातावरणाचाच एक भाग होणे,” असे मत व्यक्त केले. “आजच्या कार्यक्रमात प्रत्येक क्षेत्रातील बाप माणूस उपस्थित आहे. प्रत्येकजण आपल्या क्षेत्रात मोठा असतो. मामा यांच्या पोलिस सेवेतील कार्याची साक्ष आज येथे उपस्थित असलेला जनसमुदाय देत आहे,” असेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमास मुरलीधर कासार, जितेंद्र पाटील, उपनगराध्यक्ष डॉ.प्रशांत भोंडे,नगरसेवक महेंद्र बाविस्कर, मा.नगरसेवक दिपक तायडे,नगरसेवक अतिश झाल्टे, अमोल चव्हाण,डॉ. बेंद्रे, प्रकाश पाटील, सुभाष पवार,जगदीश बैरागी, कमलेश पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक निलेश पाटील यांनी केले सूत्रसंचालन राजेंद्र भोसले यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार एकेश मनोहर पाटील यांनी मानले.



