पंचायत समितीसमोर बेशिस्त पार्किंगवर ‘सिंघम’ स्टाईल कारवाई, मात्र अंतर्गत भ्रष्टाचारावर ‘अर्थपूर्ण’ मौन!
गटविकास अधिकाऱ्यांचा दुटप्पीपणा चव्हाट्यावर; नियमबाह्य प्रवासभत्ता (TA/DA) वसुलीस जाणीवपूर्वक विलंब?

पंचायत समितीसमोर बेशिस्त पार्किंगवर ‘सिंघम’ स्टाईल कारवाई, मात्र अंतर्गत भ्रष्टाचारावर ‘अर्थपूर्ण’ मौन!
गटविकास अधिकाऱ्यांचा दुटप्पीपणा चव्हाट्यावर; नियमबाह्य प्रवासभत्ता (TA/DA) वसुलीस जाणीवपूर्वक विलंब?
जामनेर:
पंचायत समिती कार्यालयाबाहेर बेशिस्तपणे लावलेल्या दुचाकींची चक्क हवा सोडून शिस्तीचा बडगा उगारणारे गटविकास अधिकारी श्री. कृष्ण इंगळे साहेब आपल्याच कार्यालयातील बेकायदेशीर भत्ते वाटपावर मात्र गप्प का? असा संतप्त सवाल आता उपस्थित होत आहे. बाहेर शिस्तीचा देखावा आणि आत गैरप्रकारांना पाठीशी घालण्याचा प्रकार सध्या चर्चेचा विषय बनला आहे.
पार्किंगवर कारवाईचा दिखावा
कार्यालयाच्या आवारात बेशिस्तपणे उभ्या केलेल्या एका दुचाकीची (MH19D M5868) चक्क हवा काढून कारवाई करण्यात आल्याचे चित्र समोर आले आहे.
साहेबांचा हा अनोखा दंडुका आणि शिस्तीचा इशारा नक्कीच कौतुकास्पद वाटत असला तरी, कार्यालयांतर्गत सुरू असलेल्या भोंगळ कारभाराकडे त्यांचे सोयीस्कर दुर्लक्ष होत असल्याची टीका होत आहे.
कार्यालयात मात्र शिस्तीचा पुरता बोजवारा!
एकीकडे बाहेरच्यांना शिस्त लावणारे अधिकारी अंतर्गत गैरप्रकारांवर मात्र मूग गिळून गप्प आहेत.
जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाच्या पत्रानुसार (दि. २१/०५/२०२६), ग्रामविकास अधिकाऱ्यांनी त्यांच्या मासिक दैनंदिन्या मंजूर नसतानाही नियमबाह्यरीत्या कायम प्रवास भत्ता घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.
जामनेर पंचायत समितीच्या अंतर्गत चौकशी अहवालात उघड झाले आहे की, एकूण ७६ कार्यरत ग्रामविकास अधिकाऱ्यांपैकी केवळ १२ अधिकारी नियमित दैनंदिनी सादर करतात, ३७ विलंबाने सादर करतात, तर २७ अधिकारी दैनंदिनी सादरच करत नाहीत.
असे असतानाही, सर्व ग्रामविकास अधिकाऱ्यांना कायम प्रवासभत्ता देण्यात आला आहे.
वसुलीला विलंब का? ‘हात का थरथरत आहेत?’
जिल्हा परिषद जळगावच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी या नियमबाह्य भत्त्याची वसुली करून तो शासनाकडे जमा करण्याचे स्पष्ट आदेश दिलेले आहेत.
ग्रामपंचायत अधिकाऱ्यांकडून वसुली करणेबाबत पत्र निर्गमित झाले असतानाही, अजून वसुली करण्यास जाणूनबुजून विलंब का होत आहे?
वसुलीची टिपणी ठेवताना साहेबांचे हात का थरथरत आहेत? यात थेट शासनाचा आर्थिक तोटा आणि पर्यायाने फायदा दडलेला आहे.
तो अधिकारी कोण?
सर्वांत महत्त्वाचा आणि अनुत्तरित प्रश्न हा आहे की, आपल्या कार्यालयातील असा कोणता अधिकारी आहे ज्याने वरिष्ठांच्या मंजुरीशिवाय हे T.A. आणि D.A. चे भत्ते अदा केले? त्याच्यावर कारवाई का होत नाही?
केवळ पार्किंगमधील मोटारसायकलींची हवा सोडून ‘शिस्त’ दाखवण्यापेक्षा, श्री कृष्ण इंगळे साहेबांनी आपल्याच कार्यालयातील नियमबाह्य काम करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्याची हिंमत दाखवावी, अशी अपेक्षा आता सामान्य जनतेकडून व्यक्त केली जात आहे.


