कर्तव्यनिष्ठ सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मनोहर पाटील जामनेर येथून सेवानिवृत्त


कर्तव्यनिष्ठ सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मनोहर पाटील जामनेर येथून सेवानिवृत्त
जामनेर:
३२ वर्षांच्या प्रदीर्घ आणि प्रामाणिक पोलीस सेवेनंतर, जामनेर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्री. मनोहर राजाराम पाटील हे ३० एप्रिल २०२६ रोजी सन्मानपूर्वक सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांच्या या प्रदीर्घ सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सेवानिवृत्ती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
मूळचे जळगाव जिल्ह्यातील मुमराबाद येथे जन्मलेले आणि सध्या जामनेर येथील गणपती नगरात वास्तव्यास असलेले श्री. पाटील यांचे जीवन कष्ट आणि प्रामाणिकपणाचे उत्तम उदाहरण आहे. विशेष म्हणजे, त्यांच्या वडिलांनीही पोलीस दलात सेवा बजावली होती, आणि तीच कर्तव्यनिष्ठेची परंपरा पुढे चालवत श्री. पाटील यांनी पोलीस सेवेचा मार्ग निवडला. सन १९९४ मध्ये ते पोलीस शिपाई म्हणून सेवेत रुजू झाले होते.
आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीला जळगाव पोलीस मुख्यालयात ७ वर्षे त्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे सेवा बजावली. त्यानंतर सन २००० ते २००५ या काळात पहूर पोलीस स्टेशन अंतर्गत शेंदुर्णी येथे कार्यरत राहून त्यांनी ग्रामीण भागातील अनेक प्रश्न अत्यंत संयमाने हाताळले. सन २००५ मध्ये जामनेर, २०१२ मध्ये बोदवड, २०१७ मध्ये वरणगाव आणि अखेरीस २०२५ पासून पुन्हा जामनेर पोलीस स्टेशन येथे त्यांनी आपली उत्कृष्ट सेवा दिली. त्यांच्या या प्रामाणिक, कर्तव्यदक्ष आणि उत्कृष्ट कामगिरीमुळेच त्यांनी ‘सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक’ या पदापर्यंत मजल मारली.
श्री. मनोहर पाटील यांची ओळख केवळ एक पोलीस अधिकारी म्हणून नसून, कर्तव्याला सर्वोच्च स्थान देणारे व्यक्तिमत्त्व म्हणून आहे. त्यांनी नेहमीच स्वतःच्या कुटुंबापेक्षा देशसेवेला प्राधान्य दिले. सण-उत्सवांच्या काळात, जेव्हा प्रत्येकजण आपल्या कुटुंबासोबत असतो, तेव्हा त्यांनी घरातील सण-समारंभ बाजूला ठेवून समाजात शांतता राखण्याचे आणि अनुचित प्रकार घडू न देण्याचे महत्त्वाचे कार्य केले.
त्यांचे कौटुंबिक जीवनही तितकेच समृद्ध असून, त्यांचा मुलगा सध्या एम.सी.ए. (MCA) चे शिक्षण घेत आहे. तसेच त्यांची मुलगी एम.बी.ए. (MBA) पूर्ण करून महाविद्यालयात कार्यरत आहे आणि व्यावसायिक जीवनात यशस्वी वाटचाल करत आहे.
श्री. पाटील यांनी दिलेल्या अमूल्य योगदानामुळे कायदा व सुव्यवस्था राखली गेली आणि नागरिकांना सुरक्षिततेची जाणीव झाली. त्यांच्या या अभिमानास्पद प्रवासाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत, त्यांच्या पुढील आयुष्यासाठी उत्तम आरोग्य, आनंद, समाधान आणि दीर्घायुष्यासाठी सदिच्छा देण्यात आल्या.


